सोलापूर,दि.६: अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी न्यायालयाने आरोपीस २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी अंबादास गावडे, रा. गावडेवाडी यास सत्र न्यायाधीश सुरवसे यांनी २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
यात हकीकत अशी की, फिर्यादी त्यांच्या पत्नी, दोन मुले व पीडिता यांच्यासह राहत होते. तसेच फिर्यादी शेती करून व गावडेवाडी येथे किराणा दुकान चालवून त्यांची व त्यांच्या कुटुंबाची गुजराण करत होते. फिर्यादी यांची मुलगी पीडिता १० वी ची परीक्षा झाल्यामुळे घरीच राहत होती.
दि. ०३/०५/२०२० रोजी फिर्यादीची मुलगी पीडिता हे दुपारी २ च्या सुमारास घरातून निघून गेल्याने ती कोठे गेली आहे, याबाबत फिर्यादी यांनी शोधाशोध केला असता फिर्यादीची मुलगी हे फिर्यादीच्या गावात राहणारा आरोपी अंबादास गावडे याचे घरातून येत असताना दिसली. फिर्यादी यांना अंबादास गावडे याचा संशय आल्याने फिर्यादी यांनी पीडिता हिस घरी आणून विश्वासात घेऊन तिला काय झाले व तू तिकडे का गेली होती असे विचारले असता ती घाबरलेली असल्याने तिने फिर्यादी यांना घाबरून काही सांगितले नाही.
फिर्यादी यांनी पीडिता हिस पुन्हा विश्वासात घेऊन विचारले असता तिने सांगितले की दि. ०८/०५/२०२० रोजी अंबादास गावडे याने त्याच्या राहते घरी पिडीता हिला बोलावून घेऊन तिचे सोबत जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केला असल्याचे सांगितले व सदर गोष्ट कोणास सांगितली तर तुझा जीव मारीन व तुझ्या घरच्यांना सुद्धा मारून टाकेन अशी धमकी दिली असे सांगितले. तसेच यापूर्वीही तीन ते चार वेळा आरोपीच्या घरी बोलावून आरोपीने पीडिता हिच्यावर बळजबरीने शारीरिक अत्याचार करून तिने जर कोणाला सांगितले तर संबंधित घटनेचे फोटो माझ्याकडे आहेत ते सर्वाना दाखवेन अशी धमकी देत होता. अश्या आशयाची फिर्याद मंद्रूप पोलीस ठाणे येथे दाखल झाली होती.
सदर खटल्याच्या सुनावणीवेळी सरकार पक्षातर्फे एकूण ०६ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी महत्वाचे साक्षीदार म्हणजे फिर्यादी, पीडिता व सदर केस चे तपासाधिकारी हे होते. सदर खटल्यामध्ये आलेल्या पुराव्यांची मीमांसा करत सत्र न्यायाधीश सुरवसे यांनी आरोपी अंबादास गावडे यास दोषी ठरवत २० वर्ष सक्तमजुरी व ४०,०००/- चा दंड ठोठावला.
यात मूळ फिर्यादी तर्फे अॅड. अभिजित इटकर तर सरकारपक्षातर्फे अॅड. प्रकाश जन्नू, अॅड. शीतल डोके यांनी तर आरोपी तर्फे अॅड. शेडबाळे (सांगली) यांनी काम पाहिले.








