अभिनेता सलमान खानने दिली ‘धर्मवीर’ चित्रपटाबद्दल पहिली प्रतिक्रिया

0

मुंबई,दि.८: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास एकनाथ शिंदे, शिवसेना खासदार संजय राऊत, अभिनेता सलमान खान, रितेश देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये प्रविण तरडे दिग्दर्शित धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचा लाँचिंग सोहळा पार पडला. ठाण्यात शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास लवकरच मोठ्या पडद्यावर साकारला जाणार आहे. प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आनंद दिघे यांच्या व्यक्तीमत्वामधील एक सामान्य व्यक्ती, शिवसेना कार्यकर्ता ते ठाण्यातील शिवसेनेचा सर्वात प्रमुख नेता असा प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे.

धर्मवीरचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडल्यानंतर सलमान खानने याबाबत प्रतिक्रिया दिली. “मी आता मराठीत बोलणार आहे. माझे नाव सलमान खान आहे आणि मला हा ट्रेलर फार आवडला. मी आता जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा करत होतो, त्यावेळी त्यांनी दिघे साहेबांबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या. यातल्या काही गोष्टीत मला माझ्यात आणि त्यांच्या साम्य जाणवले. त्यातील एक म्हणजे ते एका बेडरुममध्ये राहायचे आणि मी देखील एकाच बेडरुममध्ये राहतो. दुसरं म्हणजे त्यांचेही लग्न झालेले नव्हते आणि माझेही झालेले नाही.” असे तो म्हणाला.

“पूर्वी ‘धरम वीर’ (Dharam Veer) नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता ‘धर्मवीर’ नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटालाही प्रेक्षकांनी प्रतिसाद द्यावा, जितका ‘धरम वीरला’ मिळाला होता, अशी मी आशा करतो”, असे सलमान खानने म्हटले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरु आणि शिष्य असं नात जपणारा एकमेव पक्ष शिवसेना आहे, असं म्हटलं. शिवसेना संपवण्याचा ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला त्यांना संपवून आम्ही पुढं गेलो, असं उद्धव ठाकरे म्हणाले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे एकमेकांसमोर आल्यानंतर राग निघून जायचा आणि प्रेम पाहायला मिळायचं. सलमानभाई तुम्ही दोन साम्य सांगितली मात्र, तुम्ही दोघेही दबंग आहात. एक पिक्चरमधील आणि एक जीवनातील दबंग होते, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

आनंद दिघेंसारखी लाख मोलाची माणसं बाळासाहेब ठाकरेंना मिळाली. त्यांच्या मुशीतून तयार झालेले शिवसैनिक मला मिळाले, असं उद्धव ठाकरे म्हणाले. आनंद दिघे आपल्यातून गेले त्यावेळी त्यांचं वय ५० होतं. दिवस रात्रीचा हिशोब केला तर त्यांनी १०० वर्ष आयु्ष्य जगलं, असं उद्धव ठाकरे म्हणाले. धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाच्या नावात ठाणेकरांचं ह्रदय असा उल्लेख हवा, असं मुख्यमंत्री म्हणाले. हा चित्रपट निष्ठा म्हणजे काय असतं ते दाखवणारा आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here