मराठा आंदोलनाबद्दल अभिनेते किरण माने यांची पोस्ट चर्चेत

0

मुंबई,दि.२: मराठा आंदोलनाबद्दल अभिनेते किरण माने यांची पोस्ट चर्चेत आहे. राज्यात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण अजुनही चालू आहे, आता तर त्यांनी न्याय मिळेपर्यंत पाणी पिणार नाही, अशी भूमिकाही घेतली आहे. राज्यात काही ठिकाणी आंदोलक आक्रमक झाले असून जाळपोळीच्या घटना घडत आहे. या संपूर्ण आंदोलनाला अभिनेते किरण माने सोशल मीडियावर पोस्ट करून पाठिंबा देत आहेत. सध्या त्यांनी केलेली एक पोस्ट चर्चेत आहे.

किरण माने यांनी या पोस्टमधून सत्ताधाऱ्यांचा आणि मराठा आंदोलनावर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला आहे. “विरोधात साधी पोस्ट केली तरी अकाऊंट रिस्ट्रीक्ट होतं. जाब विचारणार्‍या पत्रकारांच्या नोकर्‍या जातात. कलाकारांना बायकॉट केलं जातं. अशा दडपशाहीच्या काळात, संविधानिक मार्गाने एक आंदोलन होतंय आणि त्याने सत्ताधार्‍यांना हलवून सोडलंय… हे खूप आशादायी आहे, एवढं जरी तुम्हाला कळत नसेल, तुम्ही मराठा आंदोलनावर जहरी टीका करुन फॅसीस्ट शक्तींना बळ देत असाल तर तुम्ही एक नंबरचे मूर्ख, मुर्दाड आणि आत्मघातकी आहात,” असं त्यांनी लिहिलं आहे.

जाळपोळीच्या घटना घडल्यावर किरण मानेंनी एक पोस्ट केली होती. “शत्रू कावेबाज असताना कशावरही आंधळेपणाने विश्वास ठेवणं घातक ठरू शकतं. जाळपोळ करणारे नक्की कोण आहेत? ते ठराविक ठिकाणीच हिंसा करत असतील तर त्यामागे काय हेतू असू शकतो? यामागचा कारण-कार्य-संबंध जाणून घ्यायला हवा. पिसाळलेला हत्ती दिसेल ते उद्ध्वस्त करतो. ठरवून विशिष्ट ठिकाणी जाऊन तोडफोट करत नाही. सावध राहून शत्रूची चाल ओळखा,” असं किरण माने म्हणाले होते.

दरम्यान, यापूर्वी किरण मानेंनी साताऱ्यात मराठा आंदोलकांची भेट घेतली होती. तसेच मराठा तरुणांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यांना उतावीळ होऊन जीवघेणे पाऊल न उचलल्याचा सल्लाही दिला होता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here