सहकर्मचाऱ्याच्या मृत्युप्रकरणी विद्यूततंत्रज्ञाची निर्दोष मुक्तता

0

सोलापूर,दि.२७: सहकर्मचाऱ्याच्या मृत्युप्रकरणी आरोपी प्रविण औदुंबर टोणपे, रा.शिराळ, तालुका माढा, सोलापुर याची सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. यात हकिकत अशी की, दिनांक १७/०९/२०१६ रोजी दुपारी २.४५ वाजता फिर्यादीचा भाऊ धनंजय व आरोपी हे वरकुटे येथील शेतात इलेक्ट्रीक पोलचे काम करत होते. त्यावेळी फिर्यादी देखील तेथे हजर होता.

यातील आरोपीने एमएसइबी ऑफिसला फोन करुन विद्युत पुरवठा बंद करण्यास सांगून त्याची खात्री करुन यातील मयत धनंजय यास पोलवर चढण्यास सांगितले. त्यानंतर धनंजय हा पोलवर चढुन काम करत असताना अचानक विद्युत पुरवठा चालू झाला. त्यामुळे धनंजय यास विजेचा धक्का बसुन तो पोलवरुन खाली पडला.

त्यामुळे धनंजय यास डोक्यावर, हातावर व पोटावर गंभीर जखमा झाल्या व त्यास फिर्यादी व इतरांनी उपचाराकरिता सरकारी दवाखान्यात नेले असता तो मरण पावल्याचे समजले.

अशारितीने आरोपीने मयत धनंजय यास पोलवर चढण्यासाठी कोणतीही सुविधा नसताना पोलवर चढविल्याने व त्यानंतर विद्युत पुरवठा बंद केला आहे किंवा कसे याबाबत काहीही खात्री न करता निष्काळजीपणा केल्याने धनंजय याचा मृत्यु ओढावला म्हणून फिर्यादी दिनेश शिंदे यांनी सदर आरोपीविरुध्द सदोष मनुष्यवधाची फिर्याद दाखल केली होती.

सदरचा खटला सोलापुर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्याकडे चालला. सदर खटल्यादरम्यान सरकार पक्षाने एकूण ५ साक्षीदार तपासले. सदर साक्षीदारांपैकी विद्युत सहा.अभियंता नागणे यांची अॅड. अभिजीत इटकर यांनी घेतलेली उलटतपासणी खटल्यास कलाटणी देणारी ठरली. सदर उलटतपासणी दरम्यान नागणे यांनी अनेक महत्वाच्या बाबी कबूल केल्या व सदर कबूल केलेल्या बाबीवरुनच सदर आरोपीची निर्दोष मुक्तता झाली.

सदर खटल्यातील अंतिम सुनावणीवेळी आरोपीतर्फे असा युक्तीवाद करण्यात आला की, सदर विद्युत पुरवठा हा सदर गावाच्या मुख्य जनित्रातुन बिघाड झाल्यामुळे अचानक सुरु झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यापोटी आरोपीच्या वकिलांनी अनेक उच्च न्यायालयाचे निवाडे दाखल केले. सदरचा आरोपीतर्फे केलेला युक्तीवाद ग्राह्य धरुन सत्र न्यायाधीश यांनी आरोपी प्रविण औदुंबर टोणपे याची निर्दोष मुक्तता केली.

यात आरोपीतर्फे अॅड. अभिजीत इटकर, अॅड. राम शिंदे, अॅड. संतोष आवळे, अॅड. फैय्याज शेख, अॅड. सुमित लवटे, अॅड. शिवाजी कांबळे यांनी काम पाहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here