माचणूर नरबळी प्रकरणातील आरोपी नानासाहेब डोकेचा मृत्यू

0

सोलापूर,दि.1: मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील प्रतीक शिवशरण याच्या नरबळी प्रकरणात कळंबोली कारागृहात असलेले शिक्षण संस्थाचालक तथा आरोपी नानासाहेब डोके याचा आजारी असताना उपचारादरम्यान मृत्यू झाला. डोके हे श्री संत दामाजी साखर कारखान्याचे माजी संचालक होते. याबाबतचा संदेश मंगळवेढा पोलीस ठाण्याला प्राप्त झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

27 ऑक्टोबर 2018 रोजी माचणूर येथील प्रतीक शिवशरण हा बालक शाळेतून घरी येऊन जेवण करून मित्राबरोबर फिरावयास गेला असता तो घरी परतलाच नाही. त्याच्या आई- वडिलांनी तपास घेतला असता त्याचा मृतदेह उसाच्या फडात पाच दिवसांनंतर आढळून आला. पोलीस तपासात त्याचा मृत्यू नरबळी झाल्याचा संशय व्यक्त करून आरोपी पकडण्यास विलंब होत असल्याप्रकरणी नागपूर- रत्नागिरी महामार्गावर माचणूर येथे ग्रामस्थांच्यावतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

तर जनहित शेतकरी संघटनेने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन केले. स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणात मुळाशी जाऊन नानासाहेब डोके व त्याच्या इतर साथीदारांना ताब्यात घेतले. तपासात त्यांनी प्रतीकची नरबळी प्रकरणातून हत्या केल्याची कबुली दिली.

तो सध्या न्यायालयीन कोठडीत होता. गेले काही दिवस सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. पुढील उपचारासाठी त्याला पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा पुणे येथे बुधवारी रात्री मृत्यू झाला. गुरुवारी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here