सोलापूर,दि.18: अक्कलकोटहून सोलापूरला येणाऱ्या प्रवासी जीपचे (jeep accident at solapur) टायर फुटून मंगळवारी (दि.16) कुंभारीजवळ झालेल्या भीषण अपघातात 6 जण ठार झाले होते. जखमींवर सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या अपघातास कारणीभूत ठरलेल्या चालकास अटक करण्यात आली होती. जीप चालकास अक्कलकोट न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. तसेच जीपच्या मालकासही अटक केल्याची माहिती वळसंग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल भोसले यांनी दिली.
सुभाष पुजारी (रा. अक्कलकोट ) अशी अटक करण्यात आलेल्या जीप मालकाचे नाव आहे. तर महिंद्रा जीपचा चालक जलिल नझीर बागवान (रा. म्हेत्रेनगर, अक्कलकोट) शहर याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. (Accident of a passenger jeep, the driver of the jeep was remanded in judicial custody and the owner was arrested)
अक्कलकोटहून सोलापूरकडे येणाऱ्या एमएच 13 एएक्स 1237 या जीपचा पुढील टायर फुटल्याने सोलापूर – अक्कलकोट रोडवर कुंभारी येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर गाडी उलटली. या अपघातात सहा जण ठार झाले.
काल मंगळवारी झालेल्या या अपघातात अक्कलकोट तालुक्यातील सहा जण ठार तर चालकासह दहा जण जखमी झाले होते. कुंभारी जवळील गंगाप्रसाद पेट्रोल पंपासमोर हा अपघात घडला होता. या अपघातात ठार झालेले सर्व सहाजण अक्कलकोट तालुक्यातील आहेत. त्यांची नावे व गावे अशी, कटेव्वा यलप्पा बनसोडे ( वय- 55), त्यांचा मुलगा बसवराज यलप्पा बनसोडे ( वय- 42), भावाचा मुलगा आनंद इरप्पा गायकवाड ( वय- 25) सर्वजण राहणार ब्यागेहळ्ळी ता. अक्कलकोट, तर लक्ष्मण मुरलीधर शिंदे ( वय- 42) राहणार बणजगोळ, ता.अक्कलकोट ), आनंद युवराज लोणारी ( वय- 28) हसापूर रोड, अक्कलकोट व सुनीता सुनील महाडकर (वय 40 राहणार दोड्याळ ता. अक्कलकोट) अशी नावे आहेत.
या प्रवासी जीपमध्ये एकूण चालकासह 16 प्रवासी होते. यातील सहा जणांचा मृत्यू झाला. इतर दहा जण जखमी झाले. सर्व जखमींची प्रकृती चांगली आहे. सर्व जखमींचा जबाब घेतल्यानंतर हा अपघात कसा झाला, चालक फोनवर बोलत होता का ?त्याची काही चूक होती का? हे तपासात निष्पन्न होईल. असे वळसंग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भोसले यांनी सांगितले.