धाराशिव,दि.१२: API सह चार पोलिसांना लाच प्रकरणात अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) सोलापूर व पुणे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. लोहारा पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षकासह चार पोलिस कर्मचाऱ्यांना लाचखोरीच्या गंभीर प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली आहे.
तक्रारदाराच्या मित्रावरील गुन्ह्यात त्याला सह-आरोपी न करण्यासाठी या चौघांनी मिळून तक्रारदाराकडून सुरुवातीला सोन्याचे कडे व रोख रक्कम घेऊनही आणखी लाचेची मागणी केली होती. सहआरोपी न करण्यासाठी तब्बल पाच लाख रुपयांची लाच मागणाऱ्या या पोलिसांपैकी पोलिस नाईक अर्जुन तिघाडे याला दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडले. या प्रकरणात पोलिस निरीक्षक (प्रभारी) ज्ञानेश्वर कुकलारे, पोलिस शिपाई आकाश भोसले आणि निवृत्ती बोळके यांच्याविरुद्ध बुधवारी (ता. १२) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
३२ वर्षीय शेतकरी असलेल्या तक्रारदाराच्या मित्रावर लोहारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होता. याच गुन्ह्यात तक्रारदाराला सह-आरोपी न करण्यासाठी आरोपी लोकसेवक ज्ञानेश्वर भीमराज कुकलारे (एपीआय), आकाश मधुकर भोसले (पोलीस शिपाई), अर्जुन शिवाजी तिघाडे (पोलीस नाईक) आणि निवृत्ति बळीराम बोळके (एएसआय) यांनी सुरुवातीला ५ लाख रुपयांची मागणी केली होती. पैसे नसल्यामुळे तक्रारदाराने स्वतःकडील १० तोळे वजनाचे सोन्याचे कडे काढून दिले. इतकेच नव्हे, तर आरोपींनी तक्रारदाराच्या भावाकडून परस्पर ४ लाख रुपये घेतले असल्याचे पडताळणीमध्ये निष्पन्न झाले. या सर्व रकमा स्वीकारल्यानंतरही आरोपी लोकसेवक पुन्हा ५ लाख रुपयांची मागणी करत होते, अशी तक्रार तक्रारदाराने ६ नोव्हेंबर २०२५ रोजी अँटी करप्शन ब्युरो, पुणे यांच्याकडे दिली.
सापळा कारवाईनंतर सर्व चार आरोपी लोकसेवकांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुद्ध लोहारा पोलीस ठाणे, जिल्हा धाराशिव येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ नुसार कलम ७, ७अ आणि १२ अन्वये गुन्हा नोंद नोंदविला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक प्रशांत चौगुले (सोलापूर) आणि पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर (पुणे) यांनी पर्यवेक्षक अधिकारी दयानंद गावड़े (उप अधीक्षक, पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली केली.








