मुंबई,दि.25: ACB ने मोठी कारवाई केली आहे. तेलंगणाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एका सरकारी अधिकाऱ्याकडून सुमारे 100 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. एसीबीच्या अधिकाऱ्यांकडून बुधवारी तेलंगणा स्टेट रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटीचे (TSRERA) सचिव आणि मेट्रो रेल्वेचे नियोजन अधिकारी एस. बालकृष्ण यांच्या घरासह विविध ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले. त्यांनी यापूर्वी हैदराबाद मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेंट अथॉरिटीमध्ये (HMDA) नगर नियोजन संचालक म्हणून काम केले आहे.
दिवसभर 14 पथकांची शोधमोहीम सुरूच
लाचलुचपत प्रतिबंधक यंत्रणेच्या 14 पथकांची शोधमोहीम सुरू होती आणि गुरुवारी पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. बालकृष्ण यांच्या घरावर, कार्यालयांवर, त्यांच्या नातेवाईकांच्या जागेवर एकाच वेळी छापे टाकण्यात आले, ज्यात 100 कोटींहून अधिकची मालमत्ता जप्त करण्यात आली.
बँकेचे लॉकर्स अद्याप उघडलेले नाहीत
आतापर्यंत सुमारे 40 लाख रुपये रोख, 2 किलो सोने, चल-अचल मालमत्तेची कागदपत्रे, 60 महागडी घड्याळे, 14 मोबाइल फोन आणि 10 लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. अधिकाऱ्याचे बँक लॉकर्स अद्याप उघडलेले नाहीत. एसीबीने किमान चार बँकांमधील लॉकर ओळखले आहेत.
एसीबीच्या अधिकाऱ्यांना अधिकाऱ्याच्या निवासस्थानी कॅश मोजण्याचे यंत्र सापडले आहे. एचएमडीएमध्ये काम केल्यानंतर त्याने संपत्ती मिळवली होती. सध्या सुरू असलेल्या शोधात आणखी मालमत्ता सापडण्याची शक्यता आहे.