मुंबई,दि.16: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गैरहजेरीनं विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. 13 मेला लोकसभेच्या चौथ्या टप्प्याचे मतदान झाले. शिरुरच्या सांगता सभेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सार्वजनिक कार्यक्रमातून गैरहजर आहेत. पंतप्रधान मोदी आणि देशातील बडे नेते महाराष्ट्राचे दौरे करत आहेत.
बारामती लोकसभा मतदार संघात खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत होत आहे. मात्र बारामती मतदारसंघातील मतदान 13 मे रोजी पार पडल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार कुठेही दिसले नाहीत. यासंदर्भात आता चर्चांना उधाण आलं असून समर्थकांनी शोधाशोध सुरू केली आहे.
बारामतीमधील मतदानाआधी अजित पवार दररोज प्रसारमाध्यमांबरोबर संवाद साधायचे आणि प्रचारसभांना देखील हजेरी लावायचे. मात्र मतदानानंतर ते ‘नॉट रिचेलब’ झाल्यानं समर्थक बुचकळ्यात पडले आहेत.
काय म्हणाले शरद पवार?
अजित पवारांच्या गैरहजेरीबाबत नाशिक दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, माझ्या मते ते आजारी आहेत, त्यांची खरच तब्येत ठीक नाही असं पवारांनी अजितदादांच्या तब्येतीवर भाष्य केले. निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यानंतर अजित पवार प्रचारात कुठेही दिसत नसल्याने त्यांची अनुपस्थिती प्रखरतेने दिसून येत आहे. अजित पवार शिरूरच्या 11 मे च्या सभेत अखेरचे दिसले होते. मात्र त्यानंतर अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमात दिसले नाहीत.
13 मे रोजीच्या चौथ्या टप्प्यानंतर अजित पवार गायब झाले. 14 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी येथून उमेदवारी अर्ज भरतानाही अजित पवारांच्या जागी प्रफुल पटेल उपस्थित होते. 15 मे रोजीच्या दिंडोरी, कल्याण मोदींच्या सभेतही ते हजर नव्हते. घाटकोपर येथील मोदींच्या रोड शोलाही अजितदादांची उपस्थिती नव्हती. अजित पवार नेमके कुणीकडे आहेत याची माहिती पक्ष कार्यालयाकडेही नसल्याचं समोर आली नाही. मात्र शरद पवारांनी अजित पवार आजारी असल्याचं सांगितले आहे.