नवी दिल्ली,दि.१६: AAP On Congress: आम आदमी पार्टीने काँग्रेसला मोठी ऑफर दिली आहे. देशात अनेक विरोधी पक्ष भाजपा विरोधात एकत्र येत आहेत. अनेक विरोधी पक्षातील नेत्यांचा भाजपा केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करत असल्याचा आरोप आहे. दिल्ली आणि पंजाबमधील सत्ताधारी पक्ष आम आदमी पार्टीने कॉंग्रेसला (AAP On Congress) एक मोठी ऑफर दिली आहे. जर कॉंग्रेस (Congress) पक्षाने दिल्ली आणि पंजाबमध्ये निवडणूक लढवली नाही तर आम्ही देखील राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या निवडणुकीत उतरणार नसल्याचे आम आदमी पक्षाने (AAP) सांगितले आहे. ‘आपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि दिल्लीचे आरोग्य मंत्री सौरभ भारद्वाज यांनी कॉंग्रेसची कोंडी करताना म्हटले की, त्यांनी दिल्ली आणि पंजाबच्या निवडणूकीत उमेदवार उभे केले नाहीत, तर आम्ही देखील मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये त्यांना सहकार्य करू अर्थात तिथे निवडणूक लढणार नाही.
AAP On Congress: आम आदमी पार्टीने दिली काँग्रेसला मोठी ऑफर
‘आप’ने दिलेल्या या ऑफरमुळे देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाची कोंडी झाल्याचे दिसते. कारण आताच्या घडीला कॉंग्रेससोबत आम आदमी पार्टी देखील केंद्रातील सत्ताधारी भाजपविरूद्ध लढाई लढत आहे. राजधानी दिल्लीत एका सभेला संबोधित करताना ‘आप’चे प्रवक्ते भारद्वाज यांनी म्हटले, “कॉंग्रेस पक्षाला दिल्लीत २०१५ आणि २०२० च्या विधानसभा निवडणुकांमध्ये एकही जागा मिळाली नव्हती. त्यामुळे जर कॉंग्रेसने दिल्ली आणि पंजाबमध्ये निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यास आम्ही देखील राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या निवडणुकीतून माघार घेऊ.”
तसेच कॉंग्रेस आम आदमी पार्टीच्या घोषणापत्राची चोरी करत असल्याचा आरोप देखील ‘आप’ने केला. “कॉंग्रेस देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष आहे, पण ते आज सी-सी, कॉपी-कट-कॉंग्रेस झाली आहे. ते अरविंद केजरीवाल यांच्या भूमिका, अजेंडा याची चोरी करत आहेत. त्यांना स्वत:चे काहीच माहिती नाही. तसेच आता हे देखील समोर येत आहे की, कॉंग्रेसमध्ये केवळ नेतृत्वाची कमी नसून विचारांचा देखील अभाव आहे”, अशा शब्दांत सौरभ भारद्वाज यांनी कॉंग्रेसवर टीकास्त्र सोडले.
Shri Siddheshwar Sugar Factory: ‘सिध्देश्वर’ची चिमणी पाडल्यानंतर सोशल मीडियातून संतप्त प्रतिक्रिया
कॉंग्रेसवर घोषणापत्र चोरी करण्याचा आरोप | AAP
कॉंग्रेसवर घोषणापत्र चोरी करण्याचा आरोप करताना ‘आप’ने म्हटले, “याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे आज देशातील सर्वात जुनी पार्टी आम आदमी पार्टीचे घोषणापत्र चोरत आहे. अरविंद केजरीवाल यांनी आमच्या घोषणापत्राचे महत्त्व पटवून दिले. कॉंग्रेसने ‘आप’च्या मोफत वीज या योजनेची खिल्ली उडवली होती. पण आता ते दुसऱ्या राज्यांमध्ये हेच सांगून जनतेसमोर जात आहेत. आमच्या मोफत वीज या अभियानाची त्यांनी खिल्ली उडवली पण हिमाचल प्रदेशमध्ये त्यांनी ३०० युनिट वीज मोफत देणार असल्याचा वादा केला.”
दरम्यान, २३ मे पासून दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरोधात विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळविण्यासाठी देशव्यापी दौरा केला. ‘आप’ने ११ मे रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानावर या अध्यादेशाविरोधात मेगा रॅली देखील काढली होती.