नवी दिल्ली,दि.18: आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर निवडणुकीपूर्वी हल्ला झाला आहे. AAP ने एक व्हिडिओ जारी केला आहे. त्यात केजरीवाल यांच्या गाडीवर हल्ला झाल्याचे म्हटले आहे. केजरीवाल यांना काळे झेंडे दाखवण्यात आले आणि दगडफेकही करण्यात आली.
आम आदमी पार्टीने X वर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘पराजयाच्या भीतीने भाजप नर्व्हस झाली आहे. अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्यासाठी भाजपचे गुंड आले आहेत. ‘भाजपा उमेदवार परवेश वर्मा यांच्या गुंडांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर प्रचार करताना विटा आणि दगडांनी हल्ला करून त्यांना इजा करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून ते प्रचार करू नयेत’ असा आरोप आपने केला आहे. आम आदमी पार्टी म्हटले आहे की, “भाजपवाले… केजरीवाल जी तुमच्या भ्याड हल्ल्याला घाबरणार नाहीत, दिल्लीची जनता तुम्हाला चोख प्रत्युत्तर देईल.”
भाजपाने दिले प्रत्युत्तर
दरम्यान, भाजपने प्रत्युत्तर देत आम आदमी पक्षावर जोरदार हल्ला चढवला आहे. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार प्रवेश वर्मा म्हणाले की, केजरीवाल यांच्या काळ्या कारने आमच्या कार्यकर्त्यांना पायदळी तुडवले आहे आणि मी त्यांना पाहण्यासाठी लेडी हार्डिंगला जात आहे. प्रवेश वर्मा म्हणाले की, गेल्या 11 वर्षांपासून दिल्लीत सुरू असलेल्या सरकारनं दिल्लीत भ्रष्टाचार तर पसरवलाच पण दिल्लीचाही नाश केला आहे. आज मी देशवासियांना आणि दिल्लीवासियांना आवाहन करायला आलो आहे की, तुम्हाला दिल्ली वाचवायची आहे, 11 वर्षात यमुना केवळ घाणच नाही तर नाल्यासारखी झाली आहे.
काय म्हणाले पोलिस?
केजरीवाल यांच्यावरील हल्ल्याबाबत दिल्ली पोलिसांनी सांगितले की, त्यांच्यावर कोणताही हल्ला झाला नाही, लाल बहादूर सदनमध्ये अरविंद केजरीवाल यांची जाहीर सभा होती, भाजपचे काही लोक सभेला आले आणि त्यांना प्रश्न विचारायचे होते. यावेळी दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या लोकांना हटवले आहे.