Aaditya Thackeray: मिरवणुकीतल्या डीजेवरून आदित्य ठाकरे यांच्या सभेत राडा

Aaditya Thackeray: मिरवणूक आणि सभा एकाच वेळी एकाच ठिकाणी आल्याने हा गोंधळ निर्माण झाला

0

औरंगाबाद,दि.7: शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे आणि अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या गाडीसमोर काहीजणांनी गोंधळ घातला आहे. ठाकरे यांच्या औरंगाबादमधल्या शिवसंवाद यात्रेदरम्यान जोरदार राडा झाला आहे. रमाई जयंती असल्यामुळे गावात पूर्वनियोजित मिरवणूक होती. मिरवणूक आणि सभा एकाच वेळी एकाच ठिकाणी आल्याने हा गोंधळ निर्माण झाला. सभास्थळी स्टेज मागून मिरवणूक जात होती, तेव्हा डीजेचा आवाज कमी करायला लावल्याने मिरवणुकीतील कार्यकर्ते संतापले आणि त्यांनी गोंधळ घालायला सुरूवात केली. (Aaditya Thackeray Aurangabad)

आदित्य ठाकरेंना अडवण्याचा प्रयत्न | Aaditya Thackeray Aurangabad

आदित्य ठाकरे यांनी पूर्ण सुरक्षा यंत्रणेमध्ये भाषण उरकलं. सभा संपल्यानंतर गाडीत बसून जातानाही मिरवणुकीतल्या संतप्त कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरेंना अडवण्याचा प्रयत्न केला. तसंच संतप्त कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर ठोसे मारले. मात्र मोठ्या पोलीस बंदोबस्तात त्यांना गावाच्या बाहेर नेण्यात आलं. आदित्य ठाकरे गेल्यानंतरही बराच वेळ गावात गोंधळ सुरू होता. आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर प्लास्टिकचे दोन पाईप फेकण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

एकमेकांना समजून घ्यावं लागतं | Aaditya Thackeray

या राड्यानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘एकमेकांना समजून घ्यावं लागतं. काही कारणास्तव डीजे बंद झाला असेल, मी त्यांची माफी मागितली. शिवशक्ती भीमशक्ती आज एक आहे, आम्ही संविधानासाठी लढत आहोत. काही अडचण झाली असेल तर माफी मागतो. डीजे बंद झाला असेल 5-10 मिनीटांसाठी, मी माईकवरूनही डीजे चालू द्या, म्हणून सांगितलं,’ असं आदित्य ठाकरे म्हणाले.

मेळावा संपल्यानंतर जयंती साजरी करत असलेल्या लोकांनी आदित्य ठाकरे आणि अंबादास दानवे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आदित्य ठाकरे यांची गाडी सुरक्षा रक्षकांनी व्यवस्थित बाहेर काढली. सध्या तेथील परिस्थिती नियंत्रणात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here