जालन्यात आयकर विभागाकडून छापा, सापडली तब्बल 390 कोटींची मालमत्ता

0

जालना,दि.11: जालना शहरातील एका स्टील कारखान्यावर आयकर विभागाकडून छापा टाकण्यात आला असून तब्बल 390 कोटीं रुपयांचं मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. स्टील कारखानदार, कपडे व्यापारी आणि रिअल इस्टेट डेव्हलपर यांच्या घरांवर छापा टाकल्यानंतर तब्बल 390 कोटींची मालमत्ता सापडली आहे. घरं, कार्यालयांवर टाकलेल्या छाप्यातून सापडलेली ही बेहिशोबी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यामध्ये 58 कोटींची रोख रक्कम तसंच 32 किलो सोन्याचे दागिने, हिरे असा ऐवज आहे. याशिवाय 300 कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेची कागदपत्रं सापडली आहेत. 1 ते 8 ऑगस्टदरम्यान ही कारवाई सुरु होती. विशेष म्हणजे, अधिकारी जवळपास 13 तास रोख रक्कम मोजत होते.

या छापेमारीत 500 रुपयांच्या नोटांचे बंडल सापडले असून 35 पिशव्यांमध्ये या नोटा भरुन ठेवण्यात आल्या होत्या. गेल्या 13 तासांपासून ही रोकड मोजण्याचं काम संबंधित विभागातील अधिकारी करत होते. येथील स्थानिक बँकेत जाऊन ही रोकड मोजण्यात आली आहे. 

जालन्यामधील चार स्टील कारखानदारांकडे बेहिशोबी मालमत्ता असल्याची माहिती प्राप्तिकर विभागाला मिळाली होती. स्थानिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने 1 ऑगस्टला या स्टील कारखानदारांच्या घरं आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. कारवाईसाठी पाच पथकं तयार करण्यात आली होती.

छापे टाकले असता एकूण 390 कोटींची बेहिशोबी मालमत्ता असल्याचं उघड झालं. यामध्ये 58 कोटींच्या रोख रकमेसह, सोन्याचे दागिने, हिरे तसंच 300 कोटींच्या स्थायी मालमत्तेचा समावेश आहे. प्राप्तिकर विभागाने सर्व मालमत्ता जप्त केली असून, कागदपत्रंही ताब्यात घेतली आहे. दरम्यान यामध्ये औरंगाबादमधील एका व्यापाऱ्याचाही समावेश आहे.

पथकांनी छापे टाकताना व्यावसायिक व त्यांच्याशी संबंधित लोकांना मागमूस लागू नये, छाप्याच्या तयारीची बातमी फुटू नये याची पूर्ण सतर्कता बाळगली. नाशिक, पुणे, ठाणे व मुंबईच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या वाहनांवर जणू काही लग्नाला जात असल्याचे भासवत इनाेव्हा कारवर नववधूच्या नावाचे स्टिकर लावले, तर काहींनी ‘दुल्हन हम ले जायेंगे’ असा मजकूर असलेले वेगवेगळे स्टिकर लावून त्यांना कोडवर्ड दिले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here