मुंबई,दि.28: मुंबईतील (Mumbai) कुर्ला परिसरात एक चार मजली इमारत कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडली आहे. कुर्ला बस डेपोच्या जवळच असलेली नाईक नगर सोसायटी नावाची चार मजली इमारत काल मध्यरात्रीच्या सुमारास कोसळली. इमारतीची संपूर्ण एक विंग कोसळल्यानं सर्वत्र खळबळ उडाली. त्यानंतर घटनास्थळावर अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या जवानांचीही तुकडी तातडीनं पोहोचली.
एनडीआरएफच्या जवनांकडून रात्रभर बचावकार्य सुरू होते. यात जवनांनी सात जणांना सुखरुप बाहेर काढलं आहे. त्यांच्यावर नजिकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इमारत दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. ढिगाऱ्याखाली आणखी 20 ते 25 जण अडकले असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.
जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळावर स्थानिक पोलीस, महापालिकेचे अधिकारी, एनडीआरएफचं पथक आणि अग्निशमन दलाचे जवान उपस्थित आहेत. बचावकार्य वेगानं सुरू आहे.