जितेंद्र आव्हाडांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल, Video आला समोर

0

ठाणे,दि.१४: राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाडांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा Video समोर आला आहे. भाजपाच्या पदाधिकारी रिदा रशीद यांनी ट्विटरवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा गुन्हा दाखल केल्यानंतर आव्हाड यांनी थेट राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. मात्र आव्हाड यांच्याविरोधात दाखल झालेल्या या विनयभंगाच्या गुन्ह्याचा ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या वादाशी काहीही संबंध नसून एका भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकाऱ्याने केलेल्या तक्रारीच्या आधारावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिला पदाधिकाऱ्याने ट्वीटरवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे.

महाराष्ट्र महिला आयोगाच्या सदस्या आणि भाजपाच्या पदाधिकारी रिदा रशीद यांनी ट्वीटरवरुन एक व्हिडीओ शेअर करत आव्हाड यांनी चारचौघांमध्ये आपल्याला अपमानित केल्याचा आरोप केला आहे. आव्हाड यांनी आपल्याला हात लावून बाजूला केल्याचा आरोप करतानाच त्यांनी आपल्याला पाहताच एक वाक्य म्हटल्याचंही रशीदा यांनी म्हटलं आहे. संपूर्ण घटनेचा व्हिडीओ रशिदा यांनी ट्वीट केला आहे.

रविवारी ठाणे आणि कळवा या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या तिसऱ्या खाडी पुलाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमानंतर जितेंद्र आव्हाड हे मुख्यमंत्री शिंदेंच्या गाडीच्या बाजूने कार्यकर्त्यांच्या गर्दीमधून वाट काढून पुढे सरकत असतानाच रिदा रशीद हा त्यांच्या वाटेत आल्या. त्यावेळी आव्हाड यांनी रशीद यांच्या खांद्याजवळ पकडून बाजूला लोटल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. मुख्यमंत्री शिंदे गाडीमध्ये बसलेले असतानाच त्यांच्या समोरच हा सारा प्रकार घडल्याचं व्हिडीओतून दिसत आहे.

“राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सर्वांसमोर मला अपमानित केलं. “तू इथं काय करतेस” असं माझा हात पकडून म्हटलं,” असा आरोप रिदा रशीद यांनी केला आहे. “मी एक महिला असून अशाप्रकारे महिलेचा सर्वासामोर आपमान करण्यात आला आहे. पोलिसांनी याविरोधात कारवाई करावी,” अशी मागणी रशीद यांनी पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय, चित्रा वाघ, भाजपा महिला मोर्चाच्या खात्यांना टॅग करुन केली आहे.

दरम्यान, “पोलिसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासांत २ खोटे गुन्हा दाखल केले आहेत. ते ही ३५४… मी पोलिसांच्या या अत्याचाराविरुद्ध लढणार… मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे… लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत,” असं ट्वीट आव्हाड यांनी केलं आहे.

‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या शो थांबवून प्रेक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी राज्याचे माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करुन रविवारी त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली. मात्र आता ते या नव्या प्रकरणात अडकले असून या विषयावरुन आता ठाण्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here