कथित लव्ह जिहाद प्रकरण, खासदार नवनीत राणा यांच्यावर गुन्हा दाखल

0

अमरावती,दि.११: कथित लव्ह जिहाद प्रकरणावरून खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील अमरावती येथील कथित लव्ह जिहाद प्रकरणात बेपत्ता झालेल्या तरुणीने अखेर राजापेठ पोलीस ठाण्यात येऊन खासदार नवनीत राणा यांचे वक्तव्य खोटे असल्याचे म्हटले होते. या प्रकरणाला लव्ह जिहादसारखी घटना असे नाव देऊन माझी बदनामी करू नका, असे तरुणीने म्हटले होते.

शहरातून बेपत्ता झालेल्या मुलीच्या प्रकरणात लव्ह जिहादचा आरोप करणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या अडचणीत आल्या आहेत. नवनीत राणा यांनी ज्या तरुणावर आरोप केला होता, त्या तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार खासदार राणा यांच्याविरोधात राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवनीत राणा यांनी आक्रमक भूमिका घेत मुलगी बेपत्ता होण्यामागे लव्ह जिहादचा अँगल असल्याचा आरोप करत या प्रकरणाचा तपास करा, अशी मागणी राजापेठ पोलीस ठाण्यामध्ये केली होती. त्यानंतर या प्रकरणातील गायब असलेली युवती सातारा पोलिसांनी अमरावती पोलिसांकडे सुपूर्द केल्यानंतर मी शिक्षणासाठी बाहेर गेली होती, खासदार राणा यांनी माझी बदनामी करू नये, अशा स्वरूपाचा जबाब दिला होता. आता याच प्रकरणातील मुस्लीम युवकांनी नवनीत राणा यांच्याविरुद्ध राजापेठ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे.

खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात कलम ५०४, ५०६ अंतर्गत राजापेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुस्लीम मुलाचे वडील कादर शहा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की, ‘माझा मुलगा सोहेल शहा याच्यावर लव्ह जिहादचे खोटे आरोप लावून नवनीत राणा यांनी समाजामध्ये आमची बदनामी केलेली आहे. त्याचप्रमाणे आमच्या परिवारातील लोकांना पोलीस स्टेशनला बोलावून त्यांच्यासोबतही चुकीची वर्तणूक केली.’

पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्यावरच गंभीर आरोप केला आहे. ‘माझ्यावर गुन्हा दाखल व्हावा, यासाठी आरती सिंह यांनी दबाव टाकला आहे. त्यामुळे त्या माझा किती द्वेष करतात, हे खोटा गुन्हा दाखल करून त्यांनी सिद्ध केलं आहे,’ असं राणा यांनी म्हटलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here