पुणे,दि.29: पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवले (Maruti Navale) यांच्यावर पुणे पोलिसात फसवणुकीसह पीएफमध्ये घोटाळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवले याच्या कोंढव्यातील सिंहगड सिटी स्कूलमधील दीडशे पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या पगारातून 2019 ते 22 पर्यंत पीएफ भरण्यासाठी लाखो रुपये कपात करण्यात आले होते. मात्र, कपात रक्कम पीएफ खात्यांमध्ये न भरता मारुती नवले यांनी स्वतःच्या फायद्यासाठी ती रक्कम वापरली असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे पीएफ विभागाच्या भविष्यनिधी निरीक्षक यांच्या तक्रारीवरून कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारुती नवले यांच्या अनेक शैक्षणिक संस्था असून, कोंढव्यात त्यांची सिंहगड सिटी स्कूल नावाची संस्था आहे. दरम्यान, या शाळेत नोकरी करत असलेल्या दीडशे पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या पगारातून 2019 ते 22 पर्यंत पीएफ भरण्यासाठी लाखो रुपये कपात करण्यात आले होते. या सर्व कर्मचाऱ्यांची तब्बल 74 लाख रुपये मारुती नवले यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात केली होती. परंतु, कपात केलेली रक्कम मारुती नवले यांनी भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरून पीएफ घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणात मारुती नवले याच्यावर कोंढवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.








