पुणे,दि.20: नकली मुख्यमंत्री म्हणून प्रसिद्ध झालेल्या विजय मानेंवर (Vijay Mane) गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यामध्ये हा दाखल झाला आहे. विजय मानेने मुळशीतील गुंड शरद मोहोळ याच्याबरोबर समाज माध्यमावर छायाचित्र प्रसारित केल्याचे उघडकीस आले आहे. पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव यांनी फिर्याद दिली असून माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेशोत्सवादरम्यान या नकली मुख्यमंत्र्यांची मोठी क्रेज पहायला मिळली होती. अनेक ठिकाणी त्यांनी हजेरी लावली होती. तर त्यांचे डान्स करतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाले होते. अखेर आता गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढे काय कारवाई होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
समाजामध्ये मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी हा विजय मानेंवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय मानेंचा आरोपी शरद मोहळ सोबतच फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला होता. यानंतर मुख्यमंत्र्यांसारखा पेहराव करून विजय माने यांनी अनेक ठिकाणी नृत्य केल्याचा सुद्धा आरोप होत आहे.
खंडणी विरोधी पथकातील कर्मचारी सोमवारी सकाळी बंडगार्डन परिसरात गस्त घालत होते. त्या वेळी समाज माध्यमावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखी वेशभूषा करून मुळशीतील गुंड शरद मोहोळ याच्याबरोबर समाज माध्यमावर छायाचित्र प्रसारित झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी छायाचित्राची बारकाईने तपासणी केली, तेव्हा छायाचित्र प्रसारित करणाऱ्याचे नाव विजय माने असल्याचे समजले. माने मुख्यमंत्री शिंदे यांच्यासारखी वेशभूषा करून सार्वजनिक ठिकाणी तसेच कार्यक्रमात वावरत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर माने याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव यांनी बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विजय नंदकुमार माने यांच्यावर IPC 419-511, 469, 500, 501, माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये (Information Technology Act) गुन्हा (FIR) दाखल केला आहे.