राज ठाकरेंच्या निवासस्थानी झालेल्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मोठा निर्णय

0

मुंबई, दि.१९: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या निवासस्थानी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. राज ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी आज, मंगळवारी विशेष बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत अयोध्या दौरा आणि १मे रोजी औरंगाबाद येथील सभेच्या पार्श्वभूमीवर काही निर्णय घेण्यात आले आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी या बैठकीतील निर्णयांबाबत माहिती दिली आहे.

३ मेला अक्षय तृतीया आहे. ३ मेसाठी मनसेनं आणखी एक मोठी घोषणा केली आहे. या दिवशी राज्यात मनसे कार्यकर्ते पोलिसांची परवानगी घेऊन ठिकठिकाणी हनुमान चालीसाचे पठण करणार आहेत. तसंच, महाआरतीदेखील करणार आहेत. यावेळी राज ठाकरेंकडून महापूजेची सूचनाही देण्यात आली आहे, अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.

या बैठकीला महाराष्ट्रातील अनेक पदाधिकारी आले होते. १ मे रोजी होणाऱ्या औरंगाबादच्या सभेसाठी सगळी तयारी करण्यात आली आहे. त्याचबरोबर अयोध्येच्या ५ जूनच्या दौऱ्यावर राज ठाकरे जाणार आहेत. त्याचीही सगळी तयारी करण्यात आली आहे. या दौऱ्यासाठीची सध्या चर्चा सुरु आहे. अयोध्या दौऱ्यासाठी ट्रेन उपलब्ध करून देण्यासाठी मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पत्र लिहलं आहे.

तसंच, मशिदीवरील भोंग्यांबाबत ३ मे रोजीच्या मनसेच्या अल्टिमेटमवर सरकारच्या नियमावली आल्यानंतर आम्ही आमचा अजेंडा ठरवणार आहोत, अशी माहिती बाळासाहेब नांदगावकर यांनी दिली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here