जालना,दि.5: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्य सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित केले होते. सरकारने काढलेल्या अध्यादेशात सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्याचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे मराठा समाजाला मोठं यश मिळालं आहे.
नोंदी मिळालेल्या सर्व लोकांच्या परिवारास कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजे, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली होती. ती मान्य करण्यात आली आहे. मात्र सोशल मिडीयावर आरक्षणाबाबत फसवणूक झाल्याचे मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.
मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन संपलेलं नाही असं सांगत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारविरोधात पुन्हा आंदोलनाचं हत्यार उगारलंय. सगेसोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी 9 फेब्रुवारीची डेडलाईन दिलीय. नाहीतर 10 फेब्रुवारीपासून जरांगे पुन्हा आमरण उपोषण करणार असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
मराठा आरक्षणाचा कायदा पारित करावा आणि आरक्षण लागू व्हावं म्हणून आमरण उपोषण करणार आहे, असं मनोज जरांगे यांनी जाहीर केलं आहे. तर जरांगेंच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्यामुळे आता आंदोलन करण्याची गरज नाही असं आवाहन मंत्री शंभूराज देसाई यांनी केलंय.
सोशल मिडीयावरून मनोज जरांगेंची फसवणूक झाल्याची ही टीका होती. त्यावरुन आता जरांगे चांगलेच संतापले आहेत. आरक्षण मिळालं तरीही गैरसमज पसरवण्याचे काम होत असल्याचा आरोप जरांगेंनी केलाय. हा कट रचणाऱ्यांची नावं उघड करण्याचा इशारा आता जरांगेंनी दिलाय.
यावेळी बोलताना जरांगे यांनी सरकारच्या अधिसूचनेवरुन टीका करणाऱ्यांवरही निशाणा साधला. काही जण सरकारची सुपारी घेऊन सोशल मीडियावर ट्रॅप करत आहेत. त्यांना पद पैसे हवे आहेत. 70 ते 75 वर्षात जे झालं नाही ते आज झाल्याने काही नेते आणि समाजात काम करणारे नेते जळत आहेत. त्यांना असं वाटत आहे त्यांची दुकाने बंद झाली. त्यांच्या ट्रॅपला मी घाबरत नाही, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं.