मुंबई,दि.4: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अनधिकृत मशिदीवरील भोंगे (लाऊड स्पीकर) काढण्यासाठी 4 मे पर्यंतचा अल्टिमेट दिला होता. 3 मेला ईद असल्याने कुणीही महाआरत्यांचे आयोजन करू नये असे राज ठाकरे यांनी आवाहन केले होते. काल मनसेने पत्रक काढून भोंग्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे म्हटले आहे.
“आमचं मुस्लीम धर्मियांना एवढंच सांगणं आहे की हा सामाजिक विषय आहे हे आधी समजून घ्या. या विषयाला धार्मिक वळण देण्याचा प्रकत्न केला, तर आमच्याकडून त्याचं उत्तर धर्मानेच दिलं जाईल”
“देशातल्या तमाम हिंदू बांधवांना माझी विनंती आहे की 4 मे रोजी जिथे जिथे यांचे भोंगे अजान, बांग देतील, तिथे तिथे आपण भोंग्यांवर हनुमान चालीसा लावावी.”
“भोंग्यांचा त्रास काय होतो हे त्यांनाही समजू दे. आम्हाला देशातली शांतता बिघडवायची नाही.”
“देशात आम्हाला दंगलीही नकोत परंतु आपण धर्मासाठी हट्टीपणा करणं सोडणार नसाल, तर आम्हीही आमचा हट्ट सोडणार नाही.”
“हिंदू सणांना सायलन्स झोन, शाळा, रुग्णालय अशा सर्व नावांखाली अटी घालायच्या पण मशिगदींना कोणत्याही अटी नाहीत. संविधानाने सांगितलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या कोणत्या व्याख्येत हे बसतं?” असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे.
राज ठाकरे म्हणतात “हिंदूंनो त्यांना आपली हनुमान चालीसा ऐकवा.”
“सर्व स्थानिक मंडळांनी आणि सजग नागरिकांनी भोंगे काढण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवावी आणि स्वाक्षऱ्यांची निवेदन पत्रे रोजच्या रोज पोलीस ठाण्यात नेऊन द्यावीत.”
“मशिदींमध्ये बांगेला सुरुवात झाल्या झाल्या पोलिसांसाठीच्या 100 क्रमांकावर सजग नागरिकांनी दूरध्वनी करून भोंग्यांच्या त्रासाबद्दल तक्रार करावी. रोज करावी”
“हा विषय एका दिवसात सुटणारा नाही याचीही मानसिक तयारी ठेवावी.”
देशातील सर्व राज्यकर्त्यांना हे भोंगे बंद पाडण्यास भाग पाडावे. प्रत्येक राज्यातल्या नागरिकांनी आपल्या सत्ताधारी राज्यकर्त्यांना हिंदूंची ताकद काय आहे हे दाखवून द्यावे.”
“हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कित्येक वर्षांपूर्वी सर्व भोंगे बंद झालेच पाहिजेत हे सांगितलेलं आपण ऐकणार आहात की तुम्हाला सत्तेवर बसवणाऱ्या बैगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवार यांचे ऐकणार आहात? याचा फैसला महाराष्ट्रातील जनतेसमोर एकदाचा होऊनच जाऊ दे”
“कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे की या देशात, या राज्यात कायद्याचं राज्य आहे हे त्यांनी दाखवून द्यावं.
अनधिकृत मशिदी, अनधिकृत भोंगे, रस्त्यांवर होणारे नमाज पठण यांना जबाबदार असलेल्या लोकांना आपला पोलिसी खाक्या दाखवावा.”
“देशात इतकी कारागृहं नाहीत की देशातल्या तमाम हिंदूंना कारागृहात डांबण सरकारला शक्य होईल. हे सुद्धा सर्व सरकारांनी लक्षात घ्यावे.”
“माझ्या हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, भोंगे हटवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांची बंधनं झुगारून एकत्र या. आता नाही तर कधीच नाही”
मनसेने मानले मुस्लिमांचे आभार
मनसेचे पनवेल शहराध्यक्ष योगेश चिले यांनी एक व्हिडीओ जारी करुन आज सकाळी मशिदींमधून बांग देण्यात आली नसल्याचा दावा केलाय. “आज पनवेलमध्ये पहाटे 4 वाजून 50 मिनिटांची आणि 6 वाजून 8 मिनिटांची अजान भोंग्यावरुन न होता फक्त तोंडाने बोलून झाली, असं चिले यांनी म्हटलंय. राज ठाकरेंच्या आवाहनाला पनवेलमधील मुस्लीम बांधवांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल मनसेकडून मुस्लीम बंधवांचे आभार देखील चिले यांनी व्यक्त केले आहेत. या पुढेही अशीच अजान भोंग्यांवर न देता तोंडी द्यावी, असंही चिले यांनी म्हटलं आहे. तसेच जर या पुढे भोंग्यांवर अजान दिली गेली तर हनुमान चालिसा सुद्धा भोंग्यावरच ऐकावी लागेल, असा इशारा देखील मनसेकडून देण्यात आला आहे.