मुंबई,दि.३: Maharashtra Breaking: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर आजच कारवाई होणार असल्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी ४ तारखेचा अल्टिमेटम दिला असून राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी १५ हजार लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली असून १३ हजार लोकांना नोटीस पाठवण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
पोलीस महासंचालकांनी पत्रकार परिषद घेत जर कुणी कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला तर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे. औरंगाबाद पोलीस आयुक्त राज ठाकरेंच्या भाषणाची तपासणी करत आहेत. औरंगाबाद पोलीस त्यांच्यावर कारवाई करण्यास सक्षम आहेत. मनसेच्या १५ हजार कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. अनेकांना मुंबई सोडण्याचे आदेश दिले आहेत. जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितले.
राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. ३० हजार होमगार्ड राज्यात तैनात केले आहेत. राज्य राखीव पोलीस दलाच्या ७ तुकड्याही तैनात आहेत. राज्यातील सर्व पोलीस यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. सामाजिक एकोप्यासाठी स्थानिक पातळीवर बैठका घेण्यात येत आहेत. आमची पूर्ण तयारी आहे. कायद्याची अंमलबजावणी ही पोलिसांची जबाबदारी आहे. कुणीही कायदा बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाई होईल. महाराष्ट्रातील जनतेने शांतता सुव्यवस्था राखावी असं आवाहन महाराष्ट्र पोलिसांनी केली आहे. समाजकंटकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे असंही महाराष्ट्र पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी सांगितले आहे.
कायद्याचा सन्मान राखणारे आम्ही लोक आहोत – मनसे नेते बाळा नांदगावकर
मुंबई पोलीस आयुक्तांनी नोटीस दिलीय. त्याचे स्वागत आहे. कायद्याचे पालन राखणारे आम्ही आहोत. पोलिसांनी त्यांचे कर्तव्य केले आहे. त्यांचा मानसन्मान राखायला हवा. ईद हा मुस्लीम बांधवांचा सण आहे. आमचं त्याला काहीच म्हणणं नाही. बाळा नांदगावकरमुळे समाजाला त्रास होत असेल तर माझ्यावरही कारवाई झाली पाहिजे. कायदा मोडणाऱ्या सगळ्यांवर कारवाई व्हायला हवी असं मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले आहेत.