मुंबई,दि.३०: मुंबई पोलीसांनी न्यायालयात खळबळजनक दावा केला आहे. मुंबई पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार राज्यात जाणीवपूर्वक अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ‘आम्हाला केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा स्तोत्राचे पठण करायचे होते, असा भोळेपणाचा आव आणत आरोपी राणा दाम्पत्याने जामिनासाठी अर्ज केला असला तरी हा प्रकार तितकासा साधासरळ नाही. महाविकास आघाडी सरकारच्या अस्तित्वालाच आव्हान देण्याचा मोठा डाव त्यामागे होता. सत्तेपासून वंचित असलेला भाजप आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विरोधक हे जाणीवपूर्वक सरकारविरोधी वातावरण तयार करून आघाडी सरकार उलथवून टाकण्याच्या प्रयत्नात होते’, असा दावा पोलिसांतर्फे शुक्रवारी आरोपी राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जाला न्यायालयात तीव्र विरोध दर्शवताना प्रतिज्ञापत्रात करण्यात आला.
आरोपी अपक्ष खासदार नवनीत राणा व त्यांचे आमदार पती रवी राणा यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी न्या. राहुल रोकडे यांच्यासमोर सुनावणी होऊ शकली नाही. इतर न्यायालयीन प्रकरणांमुळे सुनावणी शक्य नसून आज (शनिवारी) सुनावणी घेऊ, असे न्यायाधीशांनी स्पष्ट केले. त्याचवेळी जामीन अर्जाला उत्तर म्हणून पोलिसांतर्फे विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचे घोषित करून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत राज्य सरकारच्या यंत्रणेलाच आव्हान दिले, अशा आरोपाखाली भादंविच्या राजद्रोह कलमासह (कलम १२४-अ) अन्य कलमांखाली नोंद झालेल्या गुन्ह्यात राणा दाम्पत्य सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
‘राणा दाम्पत्याला पोलिसांनी २२ एप्रिल रोजीच नोटीस बजावून संबंधित प्रकार टाळण्यास सांगितले होते. तरीही निर्धार कायम ठेवत हे दाम्पत्य अमरातीहून मुंबईत दाखल झाले. त्यानंतर कायदा-सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला. हा प्रकार केवळ हनुमान चालीसा म्हणण्यापुरता मर्यादित नाही. या घटनेमागे मोठे कारस्थान होते. शिवसेनेची काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती होऊन सत्ता स्थापन झाल्यानंतर भाजप सत्तेपासून वंचित राहिली. त्यामुळे विरोधी पक्षांत असलेल्या भाजपकडून सध्या आघाडी सरकारच्या धोरणांवर प्रखर टीका होत आहे. शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या धोरणालाही त्यांनी लक्ष्य केले आहे.
त्याचाच भाग म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे हिंदूविरोधी असून त्यांच्या सरकारमध्ये हिंदूंचे हितरक्षण होत नाही आणि मुस्लीम समाजाला झुकते माप मिळत आहे, असे दाखवून हिंदूंच्या मनात मुस्लीम धर्मियांविषयी द्वेष निर्माण करत आणि समाजात तेढ निर्माण करत कायदा-सुव्यवस्था कोलमडली असल्याचे दाखवण्याचा भाजप व विरोधकांचा डाव होता. त्याचाच भाग म्हणून त्यांनी पवित्र स्तोत्र म्हणण्याचे कारण पुढे आणले आहे. समाजातील सौहार्दपूर्ण वातावरण बिघडवून व सामाजिक शांतता बिघडवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा हेतूपूर्वक प्रयत्न होतो, तेव्हा त्या घटनेला राजद्रोहाचे कलम लागू होते. त्यादृष्टीनेच या गुन्ह्याच्या प्रकरणात हे कलम लागू करण्यात आले आहे’, असे पोलिसांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
तुरुंगात घरचे जेवण मिळावे, असा अर्ज राणा दाम्पत्याने वांद्रे न्यायदंडाधिकारी न्यायालयात केला होता. मात्र, तो अर्ज शुक्रवारी न्यायालयाने फेटाळून लावला. नवनीत राणा यांना भायखळा तुरुंगात तर, रवी राणा यांना नवी मुंबईतील तळोजा तुरुंगात ठेवण्यात आले आहे.