बारामती, दि.१८: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आपल्या बोलण्याच्या शैलीमुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांचा बोलण्याचा स्वभाव सर्वश्रुत आहेच. पाऊस चांगला होणार आहे, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. गावोगावच्या यात्रा-जत्रा सध्या सुरू आहेत. बारामतीमध्ये सुद्धा उरूस होत आहेत. यानिमित्ताने कुस्त्यांचे फड पार पडत आहेत. कुस्त्यांच्या बरोबर तमाशे असतात. यावर उपमुख्यमंत्री पवार यांनी येथे तमाशा असतो का? असा सवाल उपस्थितांना केला. ‘हो आहे’ असे उत्तर मिळताच ‘कधी तरी बोलवा तमाशाला’ असे ते म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हास्यकल्लोळ उडाला. त्यावर पवार यांनीदेखील ‘आजोबा म्हणायचे, चल अजित तमाशाला, मात्र कधी तेव्हा जाता आलं नाही.’ यावर कोऱ्हाळे ग्रामस्थांनी ६ तारखेला आहे तमाशा असे उत्तर दिले. त्यावर पवार यांनी ‘ठीक आहे. मी बघितला काय आणि तुम्ही बघितला काय सारखंच आहे, जाऊ द्या’ असे उत्तर दिले. कोऱ्हाळे (ता. बारामती) येथील एका कार्यक्रमात रविवारी (दि. १७) पवार बोलत होते.
राज्यात व देशामध्ये काही जणांकडून धर्मा-धर्मांमध्ये जातीजातींमध्ये तेड निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. कृपया कोणीही अशा मंडळींच्या नादाला लागू नका. जातीय तणाव निर्माण झाला तर त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याचा खरा फटका गरिबाला बसतो. दिवसभर काम केल्यावर ज्याच्या घरातील चूल पेटते, अशा लोकांच्यावर त्याचा परिणाम होतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांचा समाचार घेतला.
बारामती तालुक्यातील गाडीखेल परिसरामध्ये बिबट्या सफारीबाबत चर्चा सुरू होती. मात्र, ही चर्चा मागे पडल्यानंतर त्याच परिसरात टायगर व लायन सफारी करण्याचा मानस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथील कार्यक्रमांमध्ये व्यक्त केला. येथील जागा निश्चित झाली आहे, अशी माहिती पवार यांनी दिली. त्यामुळे बारामती येथे मयूरेश्वर अभयारण्य, चिंकारा पार्क, शिवसृष्टी याबरोबरच टायगर वन लायन सफारीमुळे येथील पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार आहे.