Sharad Pawar: निकाल लागायच्या आधीच मी पुन्हा येईन असं सांगत फिरत होते पण आम्ही येऊ देतो का?: शरद पवार

0

उस्मानाबाद,दि.७: राष्ट्रवादी (NCP) पक्षाच्या मेळाव्यानिमित्त पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) उस्मानाबाद दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली. देवेंद्र फडणवीस यांच्या “मी पुन्हा येईन” या वक्तव्यावर शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना टोले लगावले.

यावेळी राज्याचा कारभार फार उत्तम पद्धतीनं चालला असल्याचंही शरद पवार म्हणाले. “संकट काळात राजकारण करायचं नसतं. काही लोकांना ते जमत नाही. ते कुठेही राजकारण करतात. निवडणूक लागायच्या आधीच, निकाल लागायच्या आधीच मी पुन्हा येईन असं सांगत फिरत होते. पण आम्ही येऊ देतो का?”, असं म्हणत शरद पवारांनी फडणवीसांच्या जखमेवर मीठ चोळलं. तुम्ही पुन्हा येणार नाही याची पूर्ण खबरदारी आम्ही घेतलेली आहे. ही आघाडी आता यशस्वी झाली आहे आणि उद्धव ठाकरे चांगलं काम करत आहेत. सत्तेसाठी नाही, तर महाराष्ट्रातील जनतेसाठी ही आघाडी काम करत आहे, असं शरद पवार म्हणाले. 

हेही वाचा PM Modi, Ajit Pawar: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडला पुणे मेट्रो लोकार्पण सोहळा; अजित पवारांचा टोला

यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे नाव न घेता शरद पवार यांनी निशाणा साधला. “कधी कधी पदावर बसलेल्या लोकांना पदाचे तारतम्य राहत नाही. लोक मला विचारतात यांचं काय करायचं? मी सोडून द्या म्हणतो”, असं शरद पवार म्हणाले. राज्य पुढे नेण्यासाठी कोणाचा आदर्श ठेवायला हवा हे ठरवायला हवं. ज्या छत्रपतींचा उल्लेख आपण केला त्या शिवछत्रपतींचं आयुष्य जिजाऊंनी घडवलं. कर्तृत्त्वाचा वसा पुरुषांनी नव्हे, तर स्त्रियांनी जपला. सावित्रीबाई फुले यांनी ज्ञानगंगा पोहोचविण्याचं काम केलं आहे, असं पवार म्हणाले. 

एक दिवसही सुट्टी दिली नाही

“देशाच्या लोकसभेत, राज्यसभेत, विधिमंडळात लोकांनी मला एकही दिवस सुट्टी दिली नाही. लोकांच्या भविष्याचा विचार करायची जबाबदारी माझ्यावर आहे. तुम्ही मला काय द्यायचं ठेवलं नाही. ४ वेळा मुख्यमंत्री, ५२ वर्षांपासून निवडून देताय, पुढील काळ लोकांच्या जीवन आणि गावं समृद्ध करण्यासाठी देणार आहे”, असं शरद पवार म्हणाले. “कोणाला सांगताय म्हतारा झालोय जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत थकणार नाही”, असंही शरद पवार म्हणाले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here