औरंगाबाद,दि.१८: Ramesh Bornare: शिवसेना आमदार रमेश बोरणारे (MLA Ramesh Bornare) यांनी भाजपाच्या कार्यक्रमाला गेल्याने महिलेला व तिच्या पतीला मारहाण केली आहे असा आरोप एका महिलेने केला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, भाजपच्या कार्यक्रमाला गेल्याच्या कारणावरून शिवसेना आमदाराकडून बेदम मारहाण केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. याप्रकरणी वैजापूरचे शिवसेना आमदार रमेश बोरणारे यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यासाठी महिला पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी पोहोचली आहे.
पीडित महिलेने केलेल्या आरोपानुसार, काल आमच्या गावात भाजपच्या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं. त्यामुळे या कार्यक्रमाला आम्ही गेलो होतो. दरम्यान आज आम्ही वैजापूर येथील गोदावरी कॉलनीत एका कार्यक्रमाला आलो असता, आमदार रमेश बोरणारे यांनी मला भाजपच्या कार्यक्रमाला का गेल्या म्हणून बेदम मारहाण केली, असा आरोप पीडित महिलेने केला आहे. तसेच रस्त्यावर खाली पाडून लाथांनी मला मारलं असल्याचं महिलेनं म्हटलं आहे.
तसेच यावेळी माझ्यासोबत माझ्या पतीला सुद्धा मारहाण केली असल्याचा आरोप महिलेनं केला आहे. तसेच आमदार यांच्यासह त्यांचे भाऊ आणि कुटुंबातील सदस्यांनी सुद्धा मारहाण केली असल्याचं महिलेनं म्हटलं आहे.
दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी महिला वैजापूर पोलीस ठाण्यात पोहोचली असून, तक्रार दाखल करत असल्याचं माहिती सूत्रांनी दिली आहे. तक्रारीनंतर पोलिस काय ॲक्शन घेतात, हे पाहणेही महत्त्वाचे आहे.