सोलापूर,दि.२५: सोलापूर शहरातील ५२ नगरांमध्ये बनावट आधारकार्ड, बनावट नोटरी, फोटोशॉप केलेले खरेदीदस्त आणि शासकीय यंत्रणेच्या कथित संगनमताने १,५०० हून अधिक प्लॉट हडप करणाऱ्या संघटित ‘डॉक्युमेंट जिहाद’ आणि ‘लँड जिहाद’च्या रॅकेटविरोधात आज, बुधवार, दि. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी सोलापूर जिल्हा परिषदेच्या पूनम गेट येथे समितीच्या वतीने तीव्र ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’ करण्यात आले. या आंदोलनात हिंदु जनजागृती समितीचे विक्रम घोडके, दत्तात्रय पिसे, बालाजी कामूर्ती, विनोद रसाळ, धनंजय बोकडे, शिवराज गडदे, राजश्री देशमुख, वर्षा जेवळे, प्रज्ञापुरी ज्ञानपीठाचे पिठासीन धर्माधिकारी प्रसाद पंडित यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय विशेष तपास पथकाद्वारे (SIT) चौकशी करून दोषी भूमाफिया व भ्रष्ट शासकीय अधिकाऱ्यांवर ‘मोक्का’ अंतर्गत कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन आंदोलनानंतर प्रशासनाला सादर करण्यात आले.
वृत्तपत्रात पुराव्यानिशी प्रसिद्ध केलेल्या वृत्तमालिकेतून या महाघोटाळ्याचा पर्दाफाश झाला आहे. सन २०१८ पासून शहरातील ५२ नगरांतील १,५०० हून अधिक प्लॉट मूळ मालकांना अंधारात ठेवून बळकावले गेले आहेत. एकाच संशयित आरोपीकडे स्वतःच्या छायाचित्रासह २१ आधारकार्डे सापडली आणि त्याद्वारे एका वर्षात ७० जागा हडपल्या गेल्या. मृत व्यक्ती व अस्तित्वात नसलेल्या वकिलांचे बनावट शिक्के मारून ४३ प्लॉटच्या महापालिका नोंदी करणे, फोटोशॉपद्वारे ३३ वर्षांपूर्वीचा दस्त बदलून १६ प्लॉटची विक्री करणे, गरीब व्यक्तींना पैसे देऊन बनावट मालक उभे करणे, दुय्यम निबंधक कार्यालय क्र. २ मधील ऑफलाइन दस्तनोंदणीचा गैरवापर करणे आणि अवघ्या एका दिवसात वीजजोडणी देणे, असे गंभीर प्रकार उघड झाले आहेत. विशेष म्हणजे, २००८ मधील कट्टरवादी संघटनांच्या बैठकीचा संदर्भ आणि ठरावीक भागांतील लोकसंख्येच्या रचनेत (डेमोग्राफी) छुप्या पद्धतीने बदल घडविण्याचे हे षड्यंत्र असल्याचा पोलिसांचा संशय शहराच्या कायदा-सुव्यवस्थेसाठी अत्यंत गंभीर असल्याचे आंदोलकांनी नमूद केले.
एमआयडीसी, विजापूर नाका व सदर बझार पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल होऊनही हे रॅकेट अद्याप सक्रिय आहे. पोलिसांनी बनावट ठरवून लेखी पत्र दिले असतानाही सोलापूर महापालिकेच्या कर विभागाने ४३ बनावट मिळकत नोंदी अद्याप रद्द केल्या नसून, उलट मूळ मालकांनाच ‘न्यायालयात जा’ अशी पत्रे देऊन त्यांची पिळवणूक चालवली आहे. त्यामुळे या सर्व ४३ बनावट नोंदी तात्काळ रद्द कराव्यात, महापालिकेने २५-३० वर्षांत केलेल्या २९,००० नोंदींपैकी संशयित ४,००० हून अधिक नोंदींचे ‘फॉरेन्सिक ऑडिट’ करावे आणि या गैरव्यवहारात सहभागी महापालिका, महसूल (तलाठी), दुय्यम निबंधक कार्यालय क्र. २ व महावितरणमधील दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निलंबन करून त्यांना सहआरोपी म्हणून गुन्ह्यात समाविष्ट करावे, अशी जोरदार मागणी या वेळी करण्यात आली.
यासोबतच एकाच छायाचित्रावरील २१ आधारकार्डे, बनावट राजपत्रे आणि मृत व्यक्तींच्या नावे झालेल्या मुद्रांक विक्रीची UIDAI व मुद्रांक विभागामार्फत स्वतंत्र चौकशी करावी, बेकायदेशीर वीजजोडण्या खंडित कराव्यात आणि दहशतीखालील मूळ प्लॉट मालकांसाठी जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त कार्यालयात स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष व पोलीस संरक्षण उपलब्ध करून द्यावे, अशा मागण्या निवेदनाद्वारे केल्या आहेत. शासनाने व प्रशासनाने या ‘डॉक्युमेंट जिहाद’ची तातडीने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई न केल्यास आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या वेळी दत्तात्रय पिसे यांनी दिला.








