Home क्राइम रूपाचा थाट अन् पापात हात; पडद्यावरील अभिनेत्रीच निघाली कुंटणखान्याची सूत्रधार! 

रूपाचा थाट अन् पापात हात; पडद्यावरील अभिनेत्रीच निघाली कुंटणखान्याची सूत्रधार! 

0

ठाणे,दि.२८: चित्रपट आणि मालिका विश्वातील लखलखाटामागे लपलेले एक धक्कादायक आणि काळे सत्य पुन्हा एकदा समोर आले आहे. हिंदी वेब सिरीज आणि चित्रपटांमध्ये काम केलेल्या एका २६ वर्षीय अभिनेत्रीला पोलिसांनी हाय-प्रोफाईल देहव्यापार चालवल्याप्रकरणी रंगेहाथ अटक केली आहे. ठाणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (AHTC) वागळे इस्टेट परिसरात कारवाई करत या कुंटणखान्याचा पर्दाफाश केला. या धडक कारवाईत आरोपी अभिनेत्रीच्या तावडीतून दोन तरुणींची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे.

बनावट ग्राहक अन् पोलिसांचा सापळा

ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील एका हॉटेलमध्ये एक अभिनेत्री इतर तरुणींना देहव्यापारासाठी घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांच्या ‘अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला’ मिळाली होती.

या बातमीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी तात्काळ एक योजना आखली. पोलीस पथकाने ‘बनावट ग्राहक’ (Decoy Customer) बनून आरोपी अभिनेत्रीशी संपर्क साधला. पोलिसांच्या बनावट ग्राहकाने मुलींची मागणी केली असता, आरोपी अभिनेत्रीने “माझ्याकडे हिंदी टीव्ही मालिका व वेब सिरीजमध्ये काम करणाऱ्या नामांकित मुली उपलब्ध आहेत” असे सांगत मोठा व्यवहार निश्चित केला.

नियोजित वेळेनुसार, आरोपी अभिनेत्री दोन तरुणींना सोबत घेऊन ठरलेल्या हॉटेलमध्ये पोहोचली. व्यवहाराची देवाणघेवाण होताच आधीच सापळा रचून बसलेल्या पोलीस पथकाने छापा टाकून तिला रंगेहाथ पकडले आणि दोन्ही पीडित तरुणींची तिच्या जाळ्यातून सुटका केली.

दोन तरुणींची सुटका; जप्त मुद्देमाल

पोलिसांनी केलेल्या या कारवाईत सुटका करण्यात आलेल्या दोन्ही पीडित महिला मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असल्याचे समोर आले आहे. आरोपी अभिनेत्रीच्या तावडीतून सुटका केल्यानंतर त्यांची रवानगी पुनर्वसन केंद्रात करण्यात आली आहे. तसेच पोलिसांकडून या कारवाईदरम्यान मोबाईल फोन आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

ग्लॅमरच्या मागे आर्थिक अडचणी

अटक करण्यात आलेली २६ वर्षीय आरोपी अभिनेत्री मूळची परराज्यातील असून ती मुंबईत भाड्याच्या घरात राहत होती. पोलीस चौकशीदरम्यान तिने या व्यवसायात येण्याचे कारण सांगितले:

कामाची अनिश्चितता: वेब सिरीज आणि लहान-मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये काम करूनही क्षेत्रात नियमित रोजगार मिळत नव्हता.

आर्थिक विवंचना: मुंबईसारख्या शहरात राहण्याचा खर्च, स्वतःच्या चैनीच्या सवयी आणि कुटुंबाचा खर्च भागवणे कठीण जात होते.

 सहज पैशांचे आमिष: आर्थिक अडचणींमुळे कमी वेळेत जास्त पैसे मिळवण्यासाठी तिने इतर गरजू महिला कलाकारांना या दलदलीत ओढण्यास सुरुवात केली आणि स्वतः या रॅकेटची सूत्रधार बनली.

कायदेशीर कारवाई

या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात आरोपी अभिनेत्रीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा (PITA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या हाय-प्रोफाईल रॅकेटचे जाळे मनोरंजन विश्वात आणखी कुठे-कुठे पसरले आहे आणि यामध्ये आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे, याचा सखोल तपास ठाणे पोलीस करत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.