नवी दिल्ली,दि.३ : देशाची राजधानी दिल्लीतील नागरिकांसाठी ११ सप्टेंबर २०२६ हा दिवस सुट्टीचा असणार आहे. दिल्ली सरकारने यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केला असून, या दिवशी राजधानीतील अनेक सरकारी तसेच खासगी आस्थापने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दिल्लीमध्ये १२ आणि १३ सप्टेंबर रोजी महत्त्वपूर्ण ब्रिक्स शिखर परिषद आयोजित करण्यात आली आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी देश-विदेशातील मान्यवर राजधानीत दाखल होणार असल्याने सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन ११ सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या शिखर परिषदेचे आयोजन प्रगती मैदान परिसरातील भारत मंडपम येथे करण्यात आले आहे. भारताकडे यंदा ब्रिक्स संघटनेचे अध्यक्षपद असल्याने या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. परिषदेसाठी विविध सदस्य आणि भागीदार देशांचे प्रमुख, आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी तसेच उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
दिल्ली सरकारच्या अखत्यारितील कार्यालयांबरोबरच केंद्र सरकारची राजधानीतील कार्यालये, स्वायत्त संस्था आणि सार्वजनिक क्षेत्रातील काही आस्थापनांनाही ११ सप्टेंबरच्या सुट्टीचा परिणाम होणार आहे. मोठ्या प्रमाणावर येणारे परदेशी पाहुणे, कडक सुरक्षा व्यवस्था आणि संभाव्य वाहतूक निर्बंध लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
भारत ब्रिक्सचा संस्थापक सदस्य असून यापूर्वीही देशाने या संघटनेच्या शिखर परिषदेचे अध्यक्षपद सांभाळले आहे. यंदाच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारताने देशातील विविध शहरांमध्ये अनेक बैठका आणि उच्चस्तरीय चर्चा आयोजित केल्या आहेत.
दरम्यान, ११ सप्टेंबरला सुट्टी जाहीर झाल्याने आणि त्यानंतर १२ व १३ सप्टेंबर रोजी ब्रिक्स परिषद असल्याने दिल्लीतील नागरिकांसाठी सलग तीन दिवसांचा वेगळाच ब्रेक मिळणार आहे. मात्र, या कालावधीत सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेसंदर्भात प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात येणार आहे.








