Home राजकारण बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला गती देण्याचे प्रशासनाचे संकेत

बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला गती देण्याचे प्रशासनाचे संकेत

0

सोलापूर,दि.१: वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पातील कायदेशीर व तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नव्या रणनीतीसह हालचाली तीव्र केल्या आहेत. प्रकल्पासाठी प्रस्तावित ३३ हेक्टर जमिनीबाबत निर्माण झालेला वन्यजीव विभागाचा आक्षेप दूर करण्यासाठी ‘वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’मार्फत नवीन सर्वेक्षण (रिसर्व्हे) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या संदर्भात जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन आणि महाराष्ट्र विमान विकास कंपनीचे (एमएडीसी) व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांच्यात उच्चस्तरीय बैठक पार पडली. पुढील चार दिवसांत एमएडीसीकडून रीतसर प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला प्राप्त होईल, ज्यानंतर भूसंपादन आणि विविध विभागांच्या परवानग्यांच्या प्रक्रियेला गती दिली जाईल.

प्रशासनाचा तांत्रिक युक्तिवाद

वन विभागाने विमानतळाच्या काही भागावर माळढोक पक्ष्यांच्या अधिवासाचा (हॅबिटॅट) हवाला देत हरकत नोंदवली आहे. तथापि, वादग्रस्त ३३ हेक्टर जागा ही माळढोक अभयारण्याच्या मूळ (कोअर), मध्यवर्ती (बफर) किंवा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील (इको-सेन्सिटिव्ह) क्षेत्रात समाविष्ट नाही, असा स्पष्ट दावा प्रशासनाने केला आहे. प्रत्यक्ष माळढोक पक्षी आढळून आलेले ठिकाण हे प्रस्तावित विमानतळाच्या सीमेपासून किमान पाच किलोमीटर अंतरावर आहे.

या दोन्ही तांत्रिक बाबींचा आधार घेऊन वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूटला पुन्हा सर्वेक्षणाची विनंती केली जाणार आहे. या प्रक्रियेसाठी साधारण सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वीही अशा सर्वेक्षणाचा प्रयत्न झाला होता, मात्र प्रशासकीय उदासीनतेमुळे तो बारगळला होता. आता मात्र नव्याने पाठपुरावा सुरू झाल्याने सोलापूरकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

होटगी रोडच्या तुलनेत बोरामणी अधिक परवडणारे

सध्या अस्तित्वात असलेल्या होटगी रोड विमानतळाचा विस्तार करणे प्रशासनासाठी अत्यंत खर्चिक व आव्हानात्मक ठरत आहे. तेथे रात्रौ लँडिंग (नाईट लँडिंग), धावपट्टीचा विस्तार, मजरेवाडी व कुमठे परिसरातील ५० एकर अतिरिक्त जमिनीचे अधिग्रहण आणि कायदेशीर अतिक्रमणे हटवण्यासाठी तब्बल २,००० कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे.

याच्या तुलनेत बोरामणी येथे नवीन विमानतळ उभारण्यासाठी केवळ ५०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे आर्थिक सुलभता आणि भविष्यातील विस्तारक्षमता लक्षात घेता बोरामणी प्रकल्प हा सोलापूरच्या हवाई कनेक्टिव्हिटीसाठी अधिक व्यावहारिक पर्याय मानला जात आहे.

प्रशासन सध्या होटगी रोडवरील त्रुटी दूर करण्यासोबतच बोरामणीचा मार्ग सुकर करण्यासाठी समांतर प्रयत्न करत असून, येत्या काळात होणाऱ्या सर्वेक्षणावरच या प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून असणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.