मुंबई,दि.२८: मंदिरातील गाभाऱ्यात VIP प्रवेशावरून उद्भवलेल्या किरकोळ वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाल्याची एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्नाटकातील भाजप आमदार बी. सुरेश गौडा यांची कन्या ऐश्वर्या आणि बंदोबस्तावर तैनात असलेल्या महिला पोलिस उपनिरीक्षक (PSI) सविता बी. पाटील यांच्यात कॅमेऱ्यासमोरच तुफान राडा झाला. आमदारपुत्रीने ऐटीत थेट महिला अधिकाऱ्याच्या तोंडावर हात उगारला, पण PSI सविता पाटील यांनीही न घाबरता ऑन-द-स्पॉट प्रतिप्रत्युत्तर देत खाकी वर्दीचा बाणा दाखवून दिला.
भीम अमावस्येला मंदिरात गर्दी अन् VIP पासचा हट्ट
मिळालेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण घटना श्रीरंगपट्टण (मंड्या) येथील प्रसिद्ध ‘आरती उक्कडा’ मंदिर परिसरात घडली. भीम अमावस्येच्या उत्सवामुळे मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी जमली होती. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मंड्या महिला पोलिस ठाण्याच्या PSI सविता बी. पाटील तेथे कर्तव्यावर तैनात होत्या.
दरम्यान, आमदार बी. सुरेश गौडा यांची मुलगी ऐश्वर्या ही आपल्या मुलांसह दर्शनासाठी आली होती. तिने सामान्य भाविकांची रांग सोडून थेट मुख्य गाभाऱ्यात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, अतिप्रचंड गर्दीमुळे सुरक्षा व्यवस्थेचे नियम पाळत PSI सविता यांनी तिला दोन मिनिटे थांबण्याची नम्र विनंती केली.
आमदाराच्या नावाने धमकी अन् थेट कानशिलात!
“मी आमदाराची मुलगी आहे, मला थांबवणारी तू कोण?” असा रुबाब दाखवत ऐश्वर्याने तेथेच महिला अधिकाऱ्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. साध्या वेशातील एका वरिष्ठ महिला पोलिस अधिकाऱ्याला गाभाऱ्यात जाताना पाहून ऐश्वर्याचा पारा अधिकच चढला.
PSI सविता यांनी ती आपल्या सीआय (Circle Inspector) अधिकारी असल्याचे स्पष्ट केले, पण ऐश्वर्या काही ऐकण्याच्या स्थितीत नव्हती. संतापाच्या भरात तिने शिवीगाळ करत, “तुझी नोकरी घालवेन” अशी धमकी दिली आणि अचानक पुढे होऊन PSI सविता यांच्या कानशिलात जोरदार थप्पड लगावली.
CCTV मध्ये कैद झाला वर्दीचा स्वाभिमान
सत्तेच्या मस्तीत अंध झालेल्या आमदाराच्या मुलीला वाटले असावे की पोलीस गप्प बसतील. मात्र, PSI सविता पाटील यांनी खाकी वर्दीचा आणि महिला अधिकाऱ्याच्या सन्मानाचा बळी पडू दिला नाही. एका सेकंदाचाही विलंब न लावता, त्यांनी जागेवरच ऐश्वर्याच्या कानशिलात सणसणीत प्रतिप्रत्युत्तर दिले. या अनपेक्षित प्रकारामुळे मंदिर परिसरात एकच गोंधळ उडाला आणि उपस्थितांनी मध्यस्थी करत दोघींना शांत केले.
आमदाराची माफी, एफआयआर दाखल
घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. याप्रकरणी PSI सविता पाटील यांच्या तक्रारीवरून कॅथानाहल्ली पोलिस ठाण्यात ऐश्वर्याविरोधात शासकीय कामात अडथळा आणणे, पोलिसांवर हल्ला करणे आणि शिवीगाळ-धमकी देणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाद अंगाशी आल्याचे पाहून आमदार बी. सुरेश गौडा यांनी बचावात्मक भूमिका घेत सार्वजनिकरीत्या माफी मागितली आहे. “माझ्या मुलीने संयम बाळगायला हवा होता; जर तिची चूक असेल तर तिने कायद्याच्या कारवाईला सामोरे गेले पाहिजे,” असे स्पष्टीकरण आमदारांनी दिले आहे.
सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून, सत्तेचा रुबाब जागीच उतरवणाऱ्या कर्तव्यदक्ष महिला PSI सविता पाटील यांच्या धाडसाचे नेटकऱ्यांकडून जोरदार कौतुक होत आहे.








