Home देश ‘पुरावा द्या, राजकारण सोडेन!’; संजय राऊतांचं थेट मुख्यमंत्र्यांनाच चॅलेंज, राजकीय वर्तुळात खळबळ!

‘पुरावा द्या, राजकारण सोडेन!’; संजय राऊतांचं थेट मुख्यमंत्र्यांनाच चॅलेंज, राजकीय वर्तुळात खळबळ!

0

मुंबई,दि.२४: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या बालपणातील चहा विक्रीच्या दाव्यावरून ठाकरेंच्या शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “मोदींनी बालपणी चहा विकल्याचा एक तरी पुरावा समोर आणून दाखवा, मी तत्काळ राजकारण सोडेन,” असे खुले आव्हान राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले.

‘रेल्वे स्टेशनच नव्हते, मग चहा कुठे विकला?’

मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका कार्यक्रमात बोलताना ‘सामान्य घरातून आलेले मोदी चहा विकत-विकत पंतप्रधान झाले’ असा उल्लेख केला होता. यावर पलटवार करताना राऊत म्हणाले की, फडणवीस पुन्हा एकदा असत्य बोलत आहेत. ज्या काळात मोदींनी चहा विकल्याचा दावा केला जातो, त्या काळात गुजरातमध्ये ते रेल्वे स्टेशन किंवा प्लॅटफॉर्म अस्तित्वातच नव्हता.

मोदींच्या मगरीसोबतच्या कुस्तीच्या कथांप्रमाणेच ‘चहा विकणे’ हीदेखील एक रचलेली बाललीला आणि दंतकथा असल्याचा टोला त्यांनी लगावला. देशातील अनेक नेते अब्दुल कलामांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत स्वतःच्या कर्तृत्वावर पुढे आले आहेत, त्यामुळे फडणवीसांनी धर्माच्या नावावर राजकारण न करता महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले पाहिजेत, असेही राऊत म्हणाले.

रॅपिडो बाईक आणि रिक्षाचालकांचा प्रश्न

यावेळी राऊत यांनी रॅपिडो बाईक सेवेमुळे स्थानिक मराठी रिक्षाचालकांच्या रोजगारावर आलेल्या संकटावरही चिंता व्यक्त केली.

परिवहन मंत्र्यांना पत्र: रॅपिडो सेवांमुळे हजारो रिक्षाचालकांची रोजीरोटी धोक्यात आली आहे. या संदर्भात आपण राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पत्र लिहिले असून रिक्षाचालकांच्या शिष्टमंडळासह त्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारवर खरमरीत टीका: एका बाजूला मराठीचा उदोउदो करायचा आणि दुसऱ्या बाजूला मराठी रिक्षाचालकांचा घास हिरावून घ्यायचा, असा दुटप्पीपणा सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

खाजगी कंपन्यांचे प्रायोजकत्व: रॅपिडो कंपनीने अनेक मंत्र्यांच्या लग्नकार्यात आणि दहीहंडी उत्सवांना प्रायोजकत्व दिले आहे, त्यामुळेच सरकार या कंपनीवर मेहेरबान आहे का? असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला.

उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री स्वतः कधीकाळी रिक्षा चालवायचे किंवा भूर्जीपाव विकायचे, मग आज ते या गरीब रिक्षाचालकांच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत? असा थेट प्रश्न विचारत राऊत यांनी सरकारला धारेवर धरले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.