Home शिक्षण बादोल्याच्या जानकर बंधूंचे ‘नीट’ परीक्षेत घवघवीत यश; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले...

बादोल्याच्या जानकर बंधूंचे ‘नीट’ परीक्षेत घवघवीत यश; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

0

अक्कलकोट,दि.१८: अक्कलकोट तालुक्यातील बादोले बुद्रुक येथील समर्थ सुभाष जानकर आणि श्रीकांत सुभाष जानकर या दोन सख्ख्या भावांनी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेत (NEET) घवघवीत यश संपादन केले आहे. या परीक्षेत श्रीकांत याने ५६३ गुण, तर समर्थ याने ५२० गुण मिळवून यशाची शिखरे पादाक्रांत केली आहेत. बादोल्यासारख्या ग्रामीण भागातील एका अत्यंत सामान्य व गरीब कुटुंबातील या दोन्ही बंधूंनी मिळवलेल्या या यशामुळे संपूर्ण तालुक्यात बादोले गावचे नाव उज्ज्वल झाले आहे. त्यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल गावकऱ्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

एकाच वेळी दोन भावांची किमया

एकाच घरातील दोन भावांनी एकाच वेळी ‘नीट’ सारख्या अत्यंत कठीण परीक्षेत एवढे मोठे यश मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. आपल्या कुटुंबाच्या बिकट आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेवून, कोणत्याही अतिरिक्त सुविधेविना केवळ जिद्दीच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवले आहे. आपल्या मुलांचे हे यश पाहून त्यांच्या आई-वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. “कठोर परिश्रम, वेळेचे नियोजन, निश्चित ध्येय, जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही,” अशी प्रतिक्रिया या दोन्ही बंधूंनी दिली.

आजच्या तरुणांना मोलाचा संदेश

आपल्या यशाबद्दल बोलताना श्रीकांत आणि समर्थ यांनी आजच्या युवा पिढीला एक मोलाचा सल्ला दिला आहे.

“आजच्या तरुणांनी मोबाईल आणि सोशल मीडियाच्या आहारी न जाता आपले पूर्ण लक्ष शिक्षणावर केंद्रित करावे. मेहनत करून आपल्या आई-वडिलांचे आणि कुटुंबाचे नाव उज्ज्वल करावे,” असे आवाहन त्यांनी केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.