सोलापूर,दि.१४: निंबर्गी (ता. दक्षिण सोलापूर) येथील एका तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली संशयित आरोपी विवेकानंद पंचाय्या स्वामी याला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मेहरोज पठाण यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
या प्रकरणातील फिर्यादी यांच्या बहिणीचे निधन झाले असल्याने, मयत तरुणी ही तिच्या मावशीकडे (फिर्यादी) राहायला आली होती. त्यांच्या घरासमोरच संशयित आरोपी विवेकानंद स्वामी हा टेलरिंगचे काम करत होता. आरोपी आणि मयत तरुणी हे दोघेही निंबर्गी येथील बसवेश्वर प्रशालेत शिक्षण घेत होते. विवेकानंद हा मयत तरुणीला सतत फोन आणि मेसेज करून भेटण्यासाठी बोलावत असे. त्याच्या या त्रासाला ती प्रचंड कंटाळली होती.
दिनांक १८ नोव्हेंबर २०२५ रोजी तरुणीने आरोपीकडून होणाऱ्या या त्रासाबद्दल आपल्या मावशीला सांगितले आणि त्यानंतर राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मयत तरुणीच्या मावशीने मंद्रूप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
जिल्हा न्यायालयानंतर हायकोर्टात धाव
या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी विवेकानंद स्वामी याने सर्वप्रथम सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर आरोपीने ॲड. रितेश थोबडे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात (कोल्हापूर सर्किट बेंच / खंडपीठ) अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला.
न्यायालयातील युक्तिवाद
जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान आरोपीचे वकील ॲड. रितेश थोबडे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला की, “सदर घटनेची फिर्याद ही विचारपूर्वक आणि तब्बल तीन महिन्यांच्या विलंबाने दाखल करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात आरोपीला पोलीस कोठडीत ठेवण्याची कोणतीही कायदेशीर आवश्यकता नाही.” हा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायमूर्तींनी आरोपी विवेकानंद स्वामी याचा अटकपूर्व जामीन मंजूर केला.
या प्रकरणात आरोपीच्या वतीने ॲड. रितेश थोबडे, ॲड. मनोज गुंडे आणि ॲड. श्रीशैल रायचूरकर यांनी काम पाहिले, तर सरकार पक्षातर्फे ॲड. एन. बी. पाटील यांनी बाजू मांडली.








