मुंबई,दि.९: “राम मंदिरावर आमचीही तेवढीच श्रद्धा आहे, जेवढी इतर कोणत्याही हिंदूची आहे. पण लोकांनी श्रद्धेने दानपेटीत टाकलेल्या पैशांची चोरी होत असेल, तर त्यावर गप्प बसायचे का? चोरीचा आणि धर्माचा काय संबंध?” अशा कडक शब्दांत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांवर तोफ डागली. मनसे रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापन दिन मेळाव्यात बोलताना त्यांनी अयोध्या राम मंदिरातील कथित घोटाळ्यावरून सत्ताधाऱ्यांचे वाभाडे काढले.
‘१५ पैकी १२ ट्रस्टी भाजप-आरएसएसचे, मग चोरी कशी झाली?’
राज ठाकरे यांनी राम मंदिर ट्रस्टच्या कारभारावर थेट बोट ठेवले. ते म्हणाले, “राम मंदिर ट्रस्टमध्ये एकूण १५ ट्रस्टी आहेत, त्यापैकी १२ जणांची नियुक्ती केंद्र सरकारने केली आहे. हे सर्वच्या सर्व १२ लोक आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि भाजपशी संबंधित आहेत. तिथे केंद्र आणि राज्य सरकारचे आयएएस (IAS) अधिकारी तैनात आहेत. तरीही तिथे ४०० कोटी (काही ठिकाणी १४०० कोटी) रुपयांची चोरी झाल्याचा आकडा समोर येतोच कसा?”
“दुसऱ्याचे सरकार असते तर भाजपने रान पेटवले असते!”
“राम मंदिरात चोरी झाल्याचा गौप्यस्फोट सर्वात आधी भाजपच्याच एका खासदाराने केला, आम्ही नाही. आज जर देशात दुसऱ्या कोणाचे सरकार असते आणि अशी चोरी झाली असती, तर भाजप, आरएसएस आणि विहिंपने मोर्चे काढून देश डोक्यावर घेतला असता. मग आज आम्ही प्रश्न विचारले तर ते राजकारण कसे?” असा रोकडा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. तसेच, प्रश्न विचारणाऱ्यांना ‘धर्मविरोधी’ ठरवणाऱ्या भय्याजी होसबाळे यांच्या वक्तव्याचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला.
मुख्यमंत्री फडणवीसांच्या ‘बघून घेऊ’ भाषेवर राज ठाकरेंचा आक्षेप
विधानसभेतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाचा समाचार घेताना राज ठाकरे कमालीचे आक्रमक झाले. “सुसंस्कृत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या तोंडी ‘बघून घेऊ’ ही भाषा शोभते का? तुमचे खासदार थेट बॉम्ब फोडण्याची भाषा करतात. सध्या सत्ताधाऱ्यांवर कोणाचाच अंकुश राहिलेला नाही,” अशी टीका त्यांनी केली.
‘मिसिंग लिंक’च्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांना घेरले
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावरून सुरू असलेल्या वादावर बोलताना राज ठाकरे म्हणाले:
१०-१२ वर्षांतील राजकारणाचा फटका: “विरोधात असताना तुम्ही वारेमाप आरोप केले, मोबाईलवरून शिव्या घालण्याची संस्कृती तुम्हीच सुरू केली. आता तेच सगळे दामदुप्पट होऊन अंगाशी आल्यावर तुम्हाला त्रास का होतोय?”
महाराष्ट्राचा अपमान कुठे झाला?: “लोकांनी ‘मिसिंग लिंक’च्या कामावर प्रश्न उपस्थित केले तर त्यात महाराष्ट्राचा अपमान कुठे आला? सत्ताधारी स्वतःच्या अपयशावर पांघरूण घालण्यासाठी महाराष्ट्राच्या अस्मितेचा आडोसा घेत आहेत.”
शेवटी भाजपला सत्तेचा माज न बाळगण्याचा इशारा देत राज ठाकरे म्हणाले, “भाजप काही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेली नाही. उद्या जेव्हा तुम्ही विरोधात बसाल, तेव्हा तुम्हीही हेच राजकारण करणार आहात, हे विसरू नका!”








