Home दुर्घटना इमारत कोसळली; १५ जण अडकल्याची भीती, मुसळधार पावसाचा फटका

इमारत कोसळली; १५ जण अडकल्याची भीती, मुसळधार पावसाचा फटका

0
इमारत कोसळली; १५ जण अडकल्याची भीती, मुसळधार पावसाचा फटका

पिंपरी-चिंचवड,दि.८: पिंपरी-चिंचवडमधील मोशी परिसरात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मोठी दुर्घटना घडली आहे. मोशी कचरा डेपो लगत असलेली एक इमारत कोसळल्याची घटना समोर आली असून, ढिगाऱ्याखाली सुमारे १४ ते १५ जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेनंतर बचावकार्याला तातडीने सुरुवात करण्यात आली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, सतत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे कचऱ्याचा डोंगर सरकून संबंधित इमारतीवर आल्याने ही दुर्घटना घडली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. प्रशासन आणि आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले असून अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, पुणे शहरासह उपनगरे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून, प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. औद्योगिक तसेच निवासी भागांमध्येही पावसाची अखंड सुरू असलेली संततधार नागरिकांच्या दैनंदिन हालचालींवर परिणाम करत आहे.

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू असल्याने जलसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. तसेच पवना आणि इंद्रायणी नद्यांच्या पातळीत वाढ झाल्याने नदीकाठच्या भागांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाने पुढील २४ ते ४८ तासांसाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. घाटमाथ्यावर अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून शहरात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी सुरू राहण्याचा अंदाज आहे.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच जुन्या इमारती, झाडे आणि वीज वाहक तारा यांपासून सुरक्षित अंतर राखण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.