Home क्राइम सून-सासू वाद प्रकरणात मोठा निर्णय; हायकोर्टाने दिला दिलासा

सून-सासू वाद प्रकरणात मोठा निर्णय; हायकोर्टाने दिला दिलासा

0
सून-सासू वाद प्रकरणात मोठा निर्णय

सोलापूर,दि.२४: सुनेच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जिवंत पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याच्या गंभीर आरोपाखाली अडकलेल्या सासूला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सोलापूर सत्र न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर, सासू संगीता सलवदे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तिथे झालेल्या नाट्यमय सुनावणीनंतर न्यायमूर्ती मेहरोज पठाण यांनी आरोपी सासूचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. मात्र, न्यायालयाने तिला पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे कडक आदेशही दिले आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

फिर्यादी सुनेचे लग्न २०१९ मध्ये सचिन सलवदे याच्याशी झाले होते. सरकारी पक्षाच्या दाव्यानुसार, २१ एप्रिल २०२५ रोजी घरात झालेल्या एका मोठ्या भांडणात सासू संगीता सलवदे यांनी सुनेच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या धक्कादायक घटनेनंतर मोहोळ पोलीस ठाण्यात सासूविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटक टाळण्यासाठी सासूने आधी सोलापूर सेशन्स कोर्टात धाव घेतली, पण तिथे त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता.

न्यायालयातील तो ‘एक’ युक्तिवाद अन् निकाल फिरला!

सत्र न्यायालयाच्या या निकालाविरोधात आरोपी सासूने अ‍ॅड. जयदीप माने यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात (खंडपीठ) अपील केले. सुनावणी दरम्यान अ‍ॅड. जयदीप माने यांनी न्यायालयासमोर हॉस्पिटलचे थेट कागदपत्रे सादर करत एक मोठा युक्तिवाद केला.

“फिर्यादी सून ही प्रत्यक्षात एका अपघातामुळे भाजली होती, हे दवाखान्यातील वैद्यकीय कागदपत्रांवरून स्पष्टपणे दिसून येते. मात्र, या अपघाती जखमेचा गैरफायदा घेऊन तिने सासूला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला आहे,” असा दावा संरक्षण पक्षाने केला.

हा युक्तिवाद आणि वैद्यकीय पुरावे ग्राह्य धरत न्यायमूर्ती मेहरोज पठाण यांनी सासू संगीता सलवदे यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला. या अत्यंत महत्त्वाच्या कायदेशीर लढाईत आरोपीतर्फे अ‍ॅड. जयदीप माने यांनी, तर सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. नितीन पाटील यांनी बाजू मांडली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.