करमाळा,दि.१५: सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झालेल्या तरुणीवर अत्त्याचार केल्याची घटना घडली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पवयीन मुलीशी मैत्री करीत जवळीक साधून अल्पवयीन मुलीवर एका तरुणाने अत्याचार केला. दोघा मित्राबरोबर संबंध ठेवण्यासाठी सांगितल्यावर ती प्रवृत्त न झाल्याने तिला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी जेवळी ( ता. लोहारा, जि. उस्मानाबाद ) येथील तीन युवकांवर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना ६ जानेवारी रोजी करमाळा तालुक्यातील एका गावात घडली आहे.
जिल्हा सत्र न्यायालयाने तीनही आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सलीम रहीमसाब सगरी ( वय २१ ), सौरभ दिनेश बनसोडे ( वय २० ), अर्जुन बाबूराव रणदिवे ( वय ३२ ), सर्व रा. जेवळी, ता. लोहारा, जिल्हा उस्मानाबाद अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने तक्रार दिली आहे. अल्पवयीन मुलगी व सलीम सगरी या दोघांची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली होती. त्या माध्यमातून तो तिला भेटू लागला. दि. ६ रोजी सकाळी दहाच्या सुमारास सलीम व संबंधित अल्पवयीन मुलगी ही एका बसस्थानकावर भेटले. त्या ठिकाणाहून ते एका लॉजवर गेले. सलीम याने त्या मुलीसोबत संबंध प्रस्थापित केले. तसेच त्याच्या इतर मित्रांना संबंध प्रस्थापित करण्यासाठी मुलीवर दबाव टाकला.
मुलीने त्याला विरोध केला. त्यावेळी तिला मारहाण करण्यात आली. त्याठिकाणाहून घरी आल्यानंतर मुलीने सर्व हकीकत आपल्या घरी कळवली. दि. १० रोजी त्या तिघा मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सदर घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन जगताप करीत आहेत.