Misuse of Aadhar Card: आधार कार्ड (Aadhar Card) हे महत्वाचे आहे. आधार कार्डशिवाय सिम कार्ड देखील घेता नाही. कुठल्याही शासकीय कामासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. आधार कार्ड शिवाय बँकेत खाते काढता येत नाही. बँकेतून कर्ज काढतानाही आधार कार्ड आवश्यक आहे. मात्र आधार कार्ड कुठेही देताना सावधगिरी बाळगली पाहिजे. अन्यथा मोठा आर्थिक फटका बसू शकतो. दुसऱ्याच्या आधार कार्डचा गैरवापर (Misuse of Aadhar Card) करत कर्ज घेतल्याची घटना घडली आहे.
लोक वेगवेगळ्या माध्यमातून फसवणूक करत आहेत. दुसऱ्याचे आधार कार्ड वापरून ७० लाखांचे कर्ज घेतल्याची घटना समोर आली आहे. ही घटना हरियाणातील रोहतकमधील आहे. फसवणूक करणाऱ्यांनी एका महिलेचे आधार कार्ड वापरून बँकेत खाते उघडले आणि त्यानंतर बँक आणि फायनान्स कंपन्यांकडून सुमारे ७० लाख रुपयांचे कर्ज घेतले.
ज्या महिलेचे आधार कार्ड आहे, तिला तिच्या नावावर दुसऱ्या कोणी कर्ज घेतल्याची कल्पना नव्हती. जेव्हा महिलेने आयकर रिटर्न भरले, तेव्हा तिला या बनावट खात्याची माहिती मिळाली. एका रिपोर्टनुसार, ही महिला पेशाने डॉक्टर आहे.
तक्रार दाखल
यानंतर सदर महिलेने बँकेत जाऊन माहिती घेतली असता आधार कार्ड आणि पॅन कार्ड क्रमांक चुकीच्या पद्धतीने वापरल्याचे समोर आले. सिबिल (CIBIL) जनरेट केल्यावर, महिलेला समजले की, उघडलेल्या बनावट खात्यावर अनेक बँकांकडून तसेच फायनान्स कंपन्यांकडून सुमारे ६५ ते ७० लाख रुपयांचे कर्ज घेण्यात आले आहे. यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
अशी घ्या काळजी
- तुमचे आधार कार्ड सोबत ठेवा आणि कोणालाही देऊ नका.
- बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड बनवूनही फसवणूक केली जात आहे. त्यामुळे तुमचा आधार क्रमांक कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नका.
- यूआयडीएआय (UIDAI) ॲपद्वारे आधार कार्ड लॉक आणि अनलॉक करण्याचा पर्याय देते. तुम्हाला गरज नसताना आधार क्रमांक लॉक करा आणि आवश्यक असेल, तेव्हा तो अनलॉक करा. त्यामुळे आधारचा गैरवापर टाळता येईल.
- अज्ञात व्यक्तीकडून आलेल्या फोन कॉल, ई-मेल किंवा संदेशावर आधार क्रमांक, ओटीपी, वैयक्तिक किंवा बँकेचे तपशील देऊ नका.
- डिजिटल आधार कार्ड मोबाईलमध्ये जतन करून ठेवा, जेणेकरून आधार कार्ड हरवण्याचा धोका कमी होईल.
- तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक करा, जेणेकरून त्याच्याशी संबंधित संदेश तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.