नवी दिल्ली,दि.9: Coronavirus updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज भारतात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली. या बैठकीत आरोग्यमंत्री, गृहमंत्री, गृह सचिव, कॅबिनेट सचिवांसह अनेक अधिकारी उपस्थित होते. बैठकीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओमिक्रॉन प्रकारांमुळे कोविडची वाढती प्रकरणे पाहता तयारीवर विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले.
त्यांनी देशातील साथीची परिस्थिती, आरोग्याच्या पायाभूत सुविधा आणि सुरू असलेली तयारी, देशातील लसीकरण मोहिमेची स्थिती आणि नवीन कोविड-19 प्रकार ओमिक्रॉनचे मूल्यांकन यावर विशेष भर दिला. आरोग्य सचिवांद्वारे सध्या जागतिक स्तरावर नोंदवल्या जाणार्या रुग्णांच्या वाढीचा तपशीलवार अहवाल देखील बैठकीत सादर करण्यात आला.
जिल्हास्तरावर तयारीची खात्री करण्यास सांगितले
पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आढावा बैठकीदरम्यान पीएम मोदींनी जिल्हा स्तरावर आरोग्यासाठी पुरेशा पायाभूत सुविधांची खात्री करण्याच्या गरजेवर भर दिला. त्यांनी अधिकाऱ्यांना याबाबत राज्यांशी समन्वय राखण्यास सांगितले.
मिशन मोडमध्ये किशोरवयीन मुलांसाठी लस मोहीम अधिक तीव्र करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. ज्या झोनमध्ये अधिक प्रकरणे आढळून येत आहेत तेथे सखोल प्रतिबंध आणि सक्रिय पाळत ठेवणे सुरू ठेवावे आणि सध्या उच्च प्रकरणे नोंदवणाऱ्या राज्यांना आवश्यक तांत्रिक सहाय्य प्रदान करण्यात यावे, असे निर्देश पंतप्रधानांनी दिले.
मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार
पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पीएम मोदी लवकरच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतील आणि कोरोनाच्या परिस्थितीचा उच्चस्तरीय आढावा घेणार आहेत.
दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय हे उद्या राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दुसरीकडे, अनेक राज्यांनी वाढत्या रुग्णसंख्येमुळे निर्बंधांमध्ये वाढ केली आहे. राजधानी दिल्लीत शुक्रवारपासून रात्री 10 वाजेपासून ते सोमवारी पहाटेपर्यंत 5 वाजेपर्यंत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच डीडीएमएने गेल्या आठवड्यात शाळा, कॉलेजे, चित्रपटगृह आणि जिम बंद करण्याचे तातडीने आदेश दिले होते.