दि.26: Digvijay Singh On PM Modi: आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत असणारे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दिग्विजय सिंह यांच्या महिलांबाबत केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते म्हणत आहेत की, जीन्स घालणाऱ्या आणि मोबाईल वापरणाऱ्या मुलींवर नाही तर 40-50 वर्षांच्या महिलांवरच पीएम मोदींचा (PM Narendra Modi) प्रभाव आहे. हा व्हिडिओ भोपाळमध्ये आयोजित जन जागरण शिबिरातील आहे. शिबिरात काँग्रेस कार्यकर्त्यांचा महिलांशी संपर्क वाढविण्याबाबत बोलले जात होते.
खरं तर, हे संपूर्ण प्रकरण असे आहे की, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रत्येक राज्यात संघटना सक्रिय करण्यात मग्न आहे. यासोबतच कार्यकर्त्यांना वैचारिक प्रशिक्षण देण्याचे कामही केले जात आहे. भोपाळमध्ये आयोजित प्रशिक्षण शिबिरात दिग्विजय सिंह महिला मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी कार्यकर्त्यांशी बोलत आहेत. व्हिडिओत, कोणत्या वयाच्या महिलांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रभाव आहे आणि कोणते कपडे घालणाऱ्या मुलींवर पंतप्रधान मोदींचा प्रभाव नाही, हे दिग्विजय सिंह सांगत आहेत.
काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना दिग्विजय सिंह म्हणत आहेत की, प्रियंका गांधी यांनी एक अतिशय मजेशीर गोष्ट सांगितली होती, जी यापूर्वी आपल्या कधीच लक्षात आली नाही. त्या (प्रियांका गांधी) म्हणाल्या होत्या, की 40 ते 50 वर्ष वयोगटातील महिलांवर मोदींचा थोडा अधिक प्रभाव आहे. पण जीन्स घालणाऱ्या आणि मोबाईल वापरणाऱ्या मुलींवर त्यांचा प्रभाव नाही. यावर चर्चा होणे आवश्यक आहे. मोबाईलवर ॲक्टिव्ह असणाऱ्या मुली सोशल मीडियावरही ॲक्टिव्ह असतात, यामुळे अशा आपण अशा लोकांशी संपर्क वाढवायला हवा.