Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला कर्नाटक सरकारला इशारा

0

मुंबई,दि.18: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) आणि मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे.
काल कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजप्रेमी भडकून उठले. कोल्हापूर, बेळगावात शिवप्रेमी भडकून उठले. त्यानंतर त्यांनी त्या भागातील कनडिगांची दुकाने बंद केली, मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी रस्त्यावर उतरल्याने कर्नाटक पोलिसांनी लाठीमारही केला. त्याचेच पडसाद फक्त कर्नाटकातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. राज्यातले नेतेही या घटनेवरून आक्रमक झालेत. (Deputy Chief Ministers Ajit Pawar warned the Karnataka government)

उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटलांचा कर्नाटकला इशारा

छत्रपती शिवाजी महाराजांची थोरवी अशा कुठल्याच घटनेने जराही कमी होणार नाही, मात्र अशा घटनांना संरक्षण देणाऱ्यांना देश माफ करणार नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्नाटकातील बंगळुरु शहरात झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबना घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत त्या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत, देशाची अस्मिता आहेत. सर्वपक्षीय राज्यकर्त्यांसाठी आदर्श आहेत.

कर्नाटकातील बंगळुरु शहरात त्यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार हा देशवासियांच्या भावना आणि राष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला आहे. पुतळा विटंबनेच्या या घटनेबद्दल महाराष्ट्रासह समस्त देशवासियांच्या भावना अत्यंत तीव्र असून या घटनेचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र शब्दात निषेध केला. कर्नाटक सरकार आणि केंद्रसरकारने या घटनेकडे गांभीर्यानं पहावे, दोषींना शोधून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमची अस्मिता

संपूर्ण भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी बंगळूर येथे विटंबना केल्याचे समजले. हा प्रकार अत्यंत संताप आणणारा आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे या घटनेचा तीव्र निषेध करतो. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमची अस्मिता आहे. आमच्या अस्मितेचा कोणी अपमान करत असेल तर आम्ही हे कदापि सहन करणार नाही. कर्नाटक सरकारने या समाजकंटकांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here