Home आरोग्य लंग कॅन्सरवर आता अवघ्या ७ मिनिटांत उपचार! भारतात क्रांतिकारी ‘कॅन्सर शॉट’ लाँच

लंग कॅन्सरवर आता अवघ्या ७ मिनिटांत उपचार! भारतात क्रांतिकारी ‘कॅन्सर शॉट’ लाँच

0

मुंबई,दि.१८: Cancer Treatment in 7 Minutes | कॅन्सर (Cancer) म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर उभे राहतात ते रुग्णालयाचे फेरे, तासन्तास चालणाऱ्या वेदनादायी थेरपी आणि मानसिक त्रास. पण फुफ्फुसाच्या कॅन्सरशी (Lung Cancer) लढणाऱ्या भारतीय रुग्णांसाठी आता वैद्यकीय क्षेत्रातील एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. ‘रोश फार्मा इंडिया’ (Roche Pharma India) या आघाडीच्या कंपनीने भारतात एक असे आधुनिक इंजेक्शन लाँच केले आहे, जे रुग्णाचा उपचाराचा वेळ तासांवरून थेट मिनिटांवर आणणार आहे. ‘टेसेंट्रिक’ (Tecentriq) नावाचे हे इम्युनोथेरपी (Immunotherapy) औषध रुग्णाला अवघ्या ७ मिनिटांत देता येणे शक्य झाले आहे.

हे इंजेक्शन प्रामुख्याने ‘नॉन-स्मॉल सेल लंग कॅन्सर’ (Non-Small Cell Lung Cancer – NSCLC) च्या उपचारासाठी विकसित करण्यात आले आहे. मात्र, या औषधाच्या वेगाइतकीच सध्या बाजारात त्याच्या किमतीचीही जोरदार चर्चा रंगली आहे. याच्या एका डोससाठी तब्बल ३.७ लाख रुपये मोजावे लागणार आहेत.

तासांचे इन्फ्युजन आता अवघ्या ७ मिनिटांत! (Subcutaneous Injection)

आतापर्यंत कॅन्सरच्या रुग्णांना आयव्ही इन्फ्युजनद्वारे (IV Infusion – सलाईनच्या माध्यमातून) इम्युनोथेरपी दिली जायची. या पारंपरिक पद्धतीमध्ये रुग्णांना बेडवर तासन्तास पडून राहावे लागायचे. मात्र, ‘टेसेंट्रिक’ या नवीन तंत्रज्ञानामुळे हे औषध थेट रुग्णाच्या त्वचेच्या खाली (Subcutaneous) टोचले जाते. यामुळे संपूर्ण प्रक्रिया अवघ्या ७ मिनिटांत पूर्ण होते. विशेषतः वयस्कर रुग्ण आणि उपचारासाठी लांबचा प्रवास करून येणाऱ्या लोकांसाठी हा ‘कॅन्सर शॉट’ (Cancer Shot) अत्यंत फायदेशीर ठरेल.

कॅन्सरच्या पेशींचा खेळ खल्लास; कसे काम करते औषध? (How it Works)

या इंजेक्शनमध्ये ‘अॅटेजोलिझुमॅब’ (Atezolizumab) हा मुख्य घटक आहे. शरीरातील ‘PD-L1’ नावाच्या प्रोटीनला (Protein) ब्लॉक करण्याचे काम हे औषध करते.

• कॅन्सर पेशींची चलाखी: कॅन्सरच्या पेशी (Cancer Cells) याच प्रोटीनचा ढालसारखा वापर करून शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीपासून (Immune System) स्वतःला लपवून ठेवतात.

• औषधाचा अ‍ॅक्शन प्लॅन: हे औषध ‘PD-L1’ प्रोटीनला ब्लॉक करते. ज्यामुळे शरीरातील इम्युन सेल्स (Immune Cells) कॅन्सर पेशींना सहज ओळखतात आणि त्यांच्यावर हल्ला करून त्या नष्ट करतात.

• कीमोथेरपीच्या (Chemotherapy) तुलनेत या उपचाराचे साइड इफेक्ट्स (Side Effects) देखील खूप कमी असतात.

एका कोर्ससाठी लाखांचा खर्च; सर्वसामान्यांना परवडणार का?

वैद्यकीय क्षेत्रातील हा शोध जेवढा क्रांतिकारी आहे, तेवढीच त्याची किंमत सामान्य भारतीय कुटुंबाचे बजेट कोलमडवणारी आहे. याच्या एका डोसची किंमत ३.७ लाख रुपये आहे. रुग्णाच्या प्रकृतीनुसार उपचारादरम्यान अशा सुमारे ६ डोसची (6 Doses) गरज भासते. म्हणजेच हा एकूण खर्च २० लाख रुपयांच्या घरात जातो.

रुग्णांसाठी आर्थिक साहाय्य योजना:

हा प्रचंड खर्च पाहता कंपनीने रुग्णांच्या मदतीसाठी ‘ब्लू ट्री’ (Blue Tree) हा साहाय्य उपक्रम सुरू केला आहे. याव्यतिरिक्त, सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी याचा समावेश ‘सीजीएचएस’ (CGHS – Central Government Health Scheme) योजनेत करण्यात आला आहे.

असे असले तरी, भारतातील सर्वसामान्य आणि गरीब रुग्णांपर्यंत हा अत्याधुनिक उपचार पोहोचवायचा असेल, तर आगामी काळात आणखी किफायतशीर (Affordable) पर्याय उपलब्ध होणे गरजेचे आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.