मुंबई,दि.५: “भोंदूबाबा अशोक खरात हा विकृत प्रवृत्तीचा माणूस आहे. समाजात अशा प्रवृत्ती ठेचून काढल्या पाहिजेत. खरातवर गुन्हा सिद्ध करून हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे आणि त्याला फाशीची शिक्षा द्यावी,” अशी आक्रमक मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार सुनील तटकरे यांनी केली आहे. खरातच्या आर्थिक साम्राज्याचे धागेदोरे समोर आल्यानंतर तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
खरातचा बँकिंग ‘स्कॅम’ उघड
अशोक खरातच्या गुन्हेगारी कृत्यांसोबतच आता त्याच्या आर्थिक गैरव्यवहाराची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. सिन्नरमधील जगदंबा पतसंस्थेत खरातने तब्बल ३२ खाती उघडल्याचे तपासात समोर आले आहे.
• ही खाती ३२ वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावावर होती, मात्र त्यांचा ताबा स्वतः खरातकडेच होता.
• या खात्यांमध्ये २ कोटी ७४ लाख रुपयांच्या ठेवी ठेवण्यात आल्या होत्या.
• पतसंस्थेच्या व्यवस्थापकाने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, २०२४ मध्ये खरातने या सर्व रकमा काढून घेतल्या आहेत.
‘कोणाचेही पाठबळ खपवून घेणार नाही’
सुनील तटकरे पुढे म्हणाले की, “या प्रकरणाची एसआयटी (SIT) मार्फत चौकशी सुरू आहे. ज्यांचा कळत-नकळत या प्रकरणाशी संबंध आला असेल, त्या सर्वांची चौकशी करून कठोर कारवाई केली जावी. यात कोणाचीही गय केली जाणार नाही.”
अजित पवार अपघात अहवालावर नाराजी
यावेळी तटकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताच्या प्राथमिक अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “आम्ही या अहवालावर समाधानी नाही. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या प्रकरणाच्याही सखोल एसआयटी चौकशीची मागणी केली आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.








