मुंबई,दि.४: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) जाहीर करून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. खरातचे राजकीय सिंडिकेट किती मोठे आहे, हे स्पष्ट करताना दमानिया यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासह अनेक बड्या नेत्यांच्या फोन कॉल्सची आकडेवारी समोर आणली आहे.
सध्या एका विवाह समारंभासाठी चंदीगडला असलेल्या दमानिया यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली. त्यांनी दावा केला की, अनेक नेते खरातशी संबंध नसल्याचे सांगत असले तरी, त्यांच्यातील संभाषणाचे पुरावे उपलब्ध आहेत.
कोणाचे किती फोन कॉल्स? (दमानिया यांच्या दाव्यानुसार)
• रुपाली चाकणकर: खरातला एकूण 177 कॉल केले. दोघांमध्ये सुमारे 33,727 सेकंद संभाषण झाले.
• प्रतिभा चाकणकर (रुपाली चाकणकर यांच्या भगिनी): यांनी खरातला 236 कॉल केले आहेत.
• एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री): खरातसोबत 17 कॉल झाले असून, त्यात 10 इनकमिंग आणि 7 आऊटगोईंग कॉल्सचा समावेश आहे. त्यांचे सर्वाधिक संभाषण 21 मिनिटांचे आहे.
• चंद्रकांत पाटील आणि सुनील तटकरे: या दोन्ही नेत्यांचे खरातला प्रत्येकी 8 कॉल आहेत.
“एवढे कॉल्स कशासाठी?” दमानियांचा सवाल
अंजली दमानिया यांनी प्रामुख्याने रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला आहे. “सर्वात जास्त संपर्क कुटुंबातील सदस्यांनंतर रुपाली चाकणकर यांच्यासोबत झाला आहे. इतका वेळ त्यांच्यात काय चर्चा झाली?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या भोंदूबावासोबत झालेल्या 17 कॉल्सबाबत स्पष्टीकरण देणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले.
हे सर्व कॉल्स ‘नॉर्मल’ असून व्हॉट्सॲप कॉलची माहिती समोर आलेली नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या खुलाशामुळे आता राज्य राजकारणात नवे वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.







