Home महाराष्ट्र भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण: मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप 

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण: मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप 

0

मुंबई,दि.२५: नाशिकचा स्वयंघोषित ‘कॅप्टन’ अशोक खरात याच्या अटकेनंतर आता राज्यातील राजकारण चांगलेच तापू लागले आहे. खरातच्या ईशान्येश्वर मंदिरासाठी तत्कालीन महायुती सरकारने कोट्यवधींचा निधी दिल्याचा प्रकार उघडकीस आला असून, यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. विशेषतः मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे.

१.५० कोटींचा ‘राजकीय’ आशीर्वाद?

शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी सोशल मीडियाद्वारे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या दाव्यानुसार, ३१ मार्च २०१८ रोजी सिन्नरमधील मिरगाव येथील खरातच्या ईशान्येश्वर देवस्थानला १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. हा निधी पर्यटन आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत देण्यात आला होता. त्याकाळी जयकुमार रावल पर्यटन मंत्री होते, तर चंद्रकांत पाटील यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते होते.

धंगेकर यांनी थेट सवाल केला आहे की, “हा निधी देऊन स्वतःचे ‘काळे पांढरे’ करण्याचा तर हा प्रकार नव्हता ना?” या प्रकरणाची सखोल पोलीस चौकशी व्हावी आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा, अशी आक्रमक मागणी त्यांनी केली आहे.

‘अघोरी पूजा’ आणि मुख्यमंत्रिपदाची आस?

दुसरीकडे, काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणाला अधिक खळबळजनक वळण दिले आहे. त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर वैयक्तिक स्वरूपाचे गंभीर आरोप केले आहेत. सपकाळ यांच्या दाव्यानुसार, चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी या भोंदू बाबाकडून अघोरी पूजा करून घेतल्याची माहिती समोर येत आहे.

इतकेच नव्हे तर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतचे खरातचे फोटोही आता सार्वजनिक झाले असून, खरातचे संबंध थेट दिल्लीपर्यंत असल्याचे संकेत मिळत आहेत. सपकाळ यांच्या मते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गेल्या सहा महिन्यांपासून खरातच्या उद्योगांची कल्पना होती, परंतु मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे हितसंबंध गुंतलेले असल्याने कारवाई करण्यास उशीर झाला. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात आता तरी कठोर भूमिका घेऊन संबंधितांना मंत्रिमंडळातून हटवावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

या प्रकरणावर आता सत्ताधारी पक्षाकडून कोणती अधिकृत प्रतिक्रिया येते आणि पोलीस तपासात आणखी कोणत्या बड्या नेत्यांची नावे समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.