इटावा,दि.१९: वीज विभागाचा भोंगळ कारभार आणि अवाजवी बिलाने एका गरिबाचा बळी घेतल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यात राहणाऱ्या एका चहा विक्रेत्याला वीज बिलाचा इतका मोठा आकडा पाहून हृदयविकाराचा झटका आला, ज्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.
नेमकी घटना काय?
भरथना पोलीस ठाण्यांतर्गत महावीर नगर भागात शिवपाल सिंह कश्यप हे राहत होते. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते चहाची टपरी चालवत असत. त्यांच्या घरात स्मार्ट मीटर बसवण्यात आले होते. मात्र, केवळ दोन महिन्यांचे बिल तब्बल ८० हजार रुपये आल्याने त्यांना मोठा धक्का बसला. हे बिल दुरुस्त करण्यासाठी त्यांनी वीज कार्यालयाचे अनेक उंबरठे झिजवले, पण प्रत्येक वेळी त्यांना रिकाम्या हाताने परत पाठवण्यात आले.
बिलाचा आकडा पाहून काळजाचा ठोका चुकला
शिवपाल सिंह आधीच ८० हजारांच्या बिलामुळे तणावाखाली असताना, तिसऱ्या महिन्यात जेव्हा नवीन बिल आले तेव्हा त्यांचा संयम सुटला. हे बिल वाढून चक्क १ लाख ४० हजार रुपये झाले होते. एवढी मोठी रक्कम आपण कधीच भरू शकणार नाही, या विचाराने आणि मानसिक दबावामुळे त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा अंत झाला.
संतप्त नातेवाईकांचे मृतदेहासह आंदोलन
शिवपाल सिंह यांच्या मृत्यूनंतर नातेवाईकांमध्ये प्रचंड संताप पसरला. संतप्त नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह भरथना वीज केंद्रावर नेला आणि तिथेच ठिय्या मांडला. “वीज विभागाच्या हलगर्जीपणामुळेच आमच्या माणसाचा जीव गेला आहे,” असा आरोप करत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
प्रशासनाची धावपळ
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलीस, तहसीलदार आणि वीज विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. सुमारे तीन तास चाललेल्या गोंधळानंतर, अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आणि मीटर रीडिंगची पुन्हा तपासणी करण्याचे आश्वासन दिले.








