सोलापूर,दि.२१: सोलापूर (Solapur) येथे होणाऱ्या आयटी पार्कबाबत (IT Park) महत्वाची माहिती समोर आली आहे. आता आयटी पार्कच्या कामाला गती मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर येथे आल्यानंतर आयटी पार्क सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर या कामाला वेग आला आहे. आयटी पार्क उभारणीसाठी होटगी रस्त्यावरील २० हेक्टर जलसंपदा विभागाची जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (एमआयडीसी) हस्तांतरित करण्याचे आदेश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी शुक्रवारी दिल्याने आयटी पार्कच्या उभारणीला आता गती मिळणार आहे.
एमआयडीसीने होटगी परिसरात सुमारे ५० एकरांवर आयटी पार्क उभारण्यास यापूर्वीच मंजुरी दिली आहे. महापालिका निवडणुकीपूर्वीच जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत या प्रस्तावावर सकारात्मक चर्चा झाली होती.
त्यानंतर विभागीय आयुक्तांनी आदेश निर्गमित केले असून ते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या कार्यालयास प्राप्त झाले आहेत. जलसंपदा विभागाकडून ही जमीन विनामूल्य एमआयडीसीकडे देण्यात येणार आहे. हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण होताच आयटी पार्कच्या प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होईल.
या प्रकल्पामुळे सोलापुरातून सुशिक्षितांचे होणारे स्थलांतर कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच वस्त्रोद्योग व्यावसायिकांना इचलकरंजीच्या धर्तीवर सुविधा देण्यासाठी लवकरच विभागीय स्तरावर बैठक घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होत असल्याचे पालकमंत्री गोरे यांनी सांगितले.








