पुणे,दि.२८: ज्या संविधानामुळे तुम्ही मंत्री झालात, ते संविधान कोणी लिहिले हे जर तुम्हाला माहित नसेल आणि त्यांचे नाव घेता येत नसेल, तर तुम्हाला पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरलेला नाही, अशा तिखट शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आंबेडकरांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांवर टीका केली. महाजन तातडीने मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणीही त्यांनी केली.
प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणातून भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख टाळल्याने राज्यात मोठे राजकीय वादंग निर्माण झाले आहे. प्रकाश आंबेडकरांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत महाजनांवर तोफ डागली.
या वादावर स्पष्टीकरण देताना गिरीश महाजन यांनी ही चूक ‘अनावधानाने’ झाल्याचे म्हटले होते, मात्र प्रकाश आंबेडकर यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. जर ही चूक अनावधानाने झाली असेल, तर तुमचे मंत्रीपदही अनावधानाने काढून टाकण्यात यावे, कारण ही काही छोटी-मोठी चूक नाही, असे प्रतिउत्तर आंबेडकरांनी दिले. यासोबतच ज्यांनी हे भाषण लिहून दिले त्या स्क्रिप्ट रायटर्सवर आणि ते वाचणाऱ्या मंत्र्यांवरही कठोर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली. मंत्र्यांनी स्वतः भाषण लिहिले असेल किंवा कोणाकडून लिहून घेतले असेल, तरीही आंबेडकरांचे नाव न येणे हा त्यांच्या कर्तव्यातील मोठा कसूर असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून त्यांची भूमिका ‘दुतोंडी’ असल्याचे म्हटले आहे. आरएसएस एकीकडे बाबासाहेबांना मानतो असे म्हणतो आणि दुसरीकडे त्यांच्या विचारांच्या विरोधात कृती करतो, अशी टीका त्यांनी केली. हिंदू कोड बिलाला सर्वात आधी आरएसएसनेच विरोध केला होता, याची आठवण करून देताना आंबेडकर म्हणाले की, मनुस्मृतीने महिलांना कोणतेही मालमत्तेचे किंवा वैयक्तिक अधिकार दिले नव्हते, मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून महिलांना हे सर्व अधिकार दिले. याच अधिकारामुळे आज नाशिकमध्ये माधवी जाधव या महिला अधिकाऱ्याने मंत्र्यांना जाब विचारण्याचे धाडस दाखवले, असेही त्यांनी स्पष्ट केले.








