सोलापूर,दि.२८: Solapur | सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. १०२ जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. सोलापूर महापालिकेच्या ३८ व्या महापौराची निवडणूक लांबणीवर गेली असून आता ३१ जानेवारीऐवजी ६ फेब्रुवारी रोजी सोलापूरला नवा महापौर मिळणार आहे. याच दिवशी उपमहापौर तसेच स्थायी आणि परिवहन समितीचे सदस्य यांचीही निवड होईल.
विभागीय आयुक्तांनी सोमवारी महापालिकेला लेखी पत्र पाठवून महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदाची निवडणूक ६ फेब्रुवारी रोजी घेण्याचे आदेश दिले आहेत. या निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया राबवण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांची पिठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी नगरसचिव प्रविण दंतकाळे यांच्याशी निवडणूक प्रक्रिया राबवण्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. निवडणूक सुरळीत पार पडावी यासाठी खबरदारीचे उपाय योजण्याबाबतही यावेळी चर्चा झाली.
येत्या २९ जानेवारी रोजी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांची पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात नोंदणी होणार आहे. त्यासाठी सर्व ८६ नगरसेवक एकत्रीतपणे पुण्याला जाणार आहेत. शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्यावर ही संपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. प्रभाग दोनमधून निवडून आलेल्या नगरसेविका शालन शिंदे तुरुंगात असल्याचे त्या हजर राहू शकत नाहीत.
दरम्यान भारतीय जनता पक्षाने महापालिकेत सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. महापौर पदाबाबत पक्षात मोठी चुरस आहे. विनायक कोंड्याल, डॉ. किरण देशमुख, नरेंद्र काळे, अनंत जाधव, रंजीता चाकोते, राजकुमार पाटील यांची नावे चर्चेत आहेत.
भाजप गटनेत्याची निवड २९ जानेवारीला होणार
महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक यापूर्वी ३१ जानेवारी रोजी घेण्याचे जवळपास निश्चित झाले होते. विभागीय आयुक्तांनी ३० आणि ३१ पैकी एक तारीख निश्चित करण्यास सांगीतले होते. त्याप्रमाणे प्रशासकीय पातळीवर तयारी सुरु होती. परंतु भाजपात महापौर पदावरुन कुरघोडीचे राजकारण सुरु झाल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. भाजप नगरसेवकांची नोंदणीदेखील एक दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. आता ती २८ ऐवजी २९ जानेवारीला होणार असून त्याच दिवशी गटनेता निवडला जाईल. बिज्जू प्रधाने, नरेंद्र काळे यांची नावे गटनेता म्हणून चर्चेत आहेत. बिज्जू प्रधाने यांना गटनेता म्हणून घोषित केले जाऊ शकते.








